
नांदेड : मुक्त विद्यापीठ नव्या तंत्रज्ञानाशी जोडणार
नांदेड : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राज्यभरातील एकूण पाच लाख विद्यार्थी विविध अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. कोरोना संकट काळात या विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा पद्धत राबवली असून, अशा पद्धतीने परीक्षा राबवणारे इतर विद्यापीठातील मुक्त विद्यापीठ हे अव्वल विद्यापीठ राहिले असून, मुक्त विद्यापीठ लवकरच नव्या तंत्रज्ञानाशी जोडणारा असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र नांदेड अभ्यास केंद्राच्या प्रतिनिधीशी रविवारी (ता. दहा) कुलगुरू यांनी संवाद साधला. या प्रसंगी शहरातील पीपल्स महाविद्यालय येथे विभागातील अभ्यासक्रमाच्या प्रतिनिधीशी संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला. व्यासपीठावर डॉ. व्यंकटेश काब्दे, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, वित्त विभागाचे उपकुलसचिव डॉ. चंद्रकांत पवार, शैक्षणिक सल्लागार डॉ. बी. के. मोहन, डॉ. आर. एम. जाधव यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना कुलगुरू म्हणाले की, महाराष्ट्रभरातून कोरोनाच्या संकटानंतरही मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रवेशाची अंतिम मुदत ता.१५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळातही विद्यार्थ्यांसाठी सुमारे आठ हजार ऑनलाइन काऊन्सिलिंग सेशन्स घेऊन एक नवा विक्रम विद्यापीठाने केला आहे. विद्यापीठ आदिवासी भागातील गावे दत्तक घेऊन तिथे मुलभूत व कौशल्यविकास शिक्षणावर भर देत आहेत. कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करून त्यांच्यातील कौशल्यास हातभार लावत आहेत.
मुक्त विद्यापीठातर्फे यावर्षीपासून अनेक प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम नव्याने सुरू करण्यात आले आहेत. या बरोबर कौशल्यविकासावर आधारित शालेय व्यवस्थापन, लॅब टेक्निशियन योगशिक्षक, इंटीरियर डिझाईन अॅन्ट डेकोरेशन, इलेक्ट्रीशियन अॅन्ट डोमेस्टिक अॅप्लीमेन्टनन्स, सिव्हील सुपरवायझर, ॲनिमेशन, कृषी अधिष्ठान, संमंत्रक प्रशिक्षण यासारख्या अनेक कौशल्यविकासावरील शिक्षणक्रमांना प्रवेश सुरू आहेत.
या शिवाय विद्यापीठाचे जर्मन, फ्रेंच, अरेबिक या भाषांमधील प्रमाणपत्र शिक्षणक्रमांसह वीस पेक्षा जास्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम लोकप्रिय ठरत असल्याचे चे कुलरुगु म्हणाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ,केंद्र संयोजक डॉ. पंढरीनाथ गड्डपवार, सुनील निकम, मनोज खलाल, बाजीराव पवार, अविनाश कोलते, डॉ. देशमुख यांनी परिश्रम घेतले.