
आर्थिक संकटाला तोंड देत दुबार पेरणीसाठी, मशागतीच्या कामात व्यस्त शेतकऱ्यांना बांधावर जाउन धिर देण्यासाठी सभापती श्री. बाळासाहेब रावणगांवकर यांनी बोरगाव, नागापूर, लामकणी (ता.भोकर) शिवारातील बाधित क्षेत्राची पाहणी केली.
नांदेड: सोयाबीनची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट कोसळले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धिर देण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली. पेरणीच्या कामात व्यस्त असलेल्या भोकर तालुक्यातील शेतकऱ्यास आधार देत चक्क तिफण हाकत पेरणी केली.
जिल्ह्यात एकूण चार लाख हेक्टर क्षेत्रापैकी निम्यावर क्षेत्रात ५६ टक्के सोयाबीन पेरणी झाली. पण बहूतांश भागात सोयबीनची उगवण झाली नाही. उगवण क्षमता कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. त्यातच मागील आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या खोळबंल्या आहेत. दुबार पेरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधाराची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांंच्या आदेशानुसार प्राप्त तक्रारीनुसार उगवण न झालेल्या बाधित क्षेत्राची कृषी विभागामार्फत तालुकास्तरीय समितीकडून पाहणी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत सभापती श्री.रावणगावकर यांनी (ता.२२) जून सोयाबीनच्या सदोष बियाणे प्रकरणी दोषी कंपण्यावर कायदेशीर कारवाईचा ठराव घेतला.
हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समोर आला एक मतप्रवाह, कोणता? ते वाचाच
भोकर तालुक्यात सात हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून ६० शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. आर्थिक संकटाला तोंड देत दुबार पेरणीसाठी, मशागतीच्या कामात व्यस्त शेतकऱ्यांना बांधावर जाउन धिर देण्यासाठी सभापती श्री. बाळासाहेब रावणगांवकर यांनी बोरगाव, नागापूर, लामकणी (ता.भोकर) शिवारातील बाधित क्षेत्राची पाहणी केली.
तालुका कृषी विभागाकडे प्राप्त तक्रारीनुसार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सभापती श्री. रावणगावकर, भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, पंचायत समिती सदस्य सूर्यकांत बिलेवाड, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते, पोखर्णी येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संदीप जायेभाये, पंचायत समिती कृषी अधिकारी छाया देशमुख, मंडळ कृषी अधिकारी रामहरी मिसाळ, कृषी पर्यवेक्षक बजरंग पुरी, कृषी सहायक पाटील आदींनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दुबार पेरणीत व्यस्त शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव सभापती श्री. रावणगावकर चक्क तिफण हाकत पेरणी केली.
येथे क्लिक करा - बोगस सोयाबीन कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची छावाची मागणी
सोयाबीनची उगवण न झालेल्या बाधित क्षेत्रांची तक्रारीनुसार पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांकडून दुबार पेरणीसाठी आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांशी बांधावर संवाद साधण्यात येत आहे.