नांदेडकरांना दिलासा : शुक्रवारी पाच वाजेपर्यंत एकही रुग्ण वाढला नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने तुर्तास तरी नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे. एकही बाधित न आढळल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या २९६ वर स्थिरावली.
 

नांदेड  : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १९) आज सायकाळी पाच वाजेपर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. सकाळी आलेले सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने तुर्तास तरी नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे. एकही बाधित न आढळल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या २९६ वर स्थिरावली.
 
२९६ पैकी आतापर्यंत १८६ बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत बाधित व्यक्तींवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली औषधोपचार चालू आहेत. औषधोपचार चालू असलेल्या तिन बाधितांमध्ये ५२ वर्षाची एक महिला आणि ५२ व ५४ वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या १३ झाली आहे.

हेही वाचा -  भावकीच्या वादातून वृद्धाला जाळून मारण्याचा प्रयत्न

शहराच्या विविध ठिकाणी उपचार सुरू

नांदेड जिल्ह्यात बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १९, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ७५, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे १३ बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून पाच बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. शुक्रवार १९ जून रोजी १९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल सकाळी प्राप्त झाला. यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- एक लाख ४५ हजार५६८,
घेतलेले स्वॅब पाच हजार ४८७,
निगेटिव्ह स्वॅब चार हजार ७१२,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- निरंक,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती २९६,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या २२९,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- ९७,
मृत्यू संख्या- १३,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- १८६,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती १०६,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची १२६ एवढी संख्या आहे.

येथे क्लिक करा दलितवस्ती विद्युतीकरणाच्या निधीवर संक्रांत- कोठे ते वाचा

प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandedian consolation: No more patients till 5 pm on Friday nanded news