नांदेडकर चिंताग्रस्त : ‘ते’ चार पॉझिटीव्ह रुग्ण बेपत्ताच

प्रल्हाद कांबळे
Monday, 4 May 2020

त्या चार बेपत्ता कोरोनाग्रस्तांमुळे रुग्णांची संख्या कितीने वाढणार हा प्रश्न सर्वसामान्यांचे डोके चक्रावून सोडणारा ठरत आहे.

नांदेड : शहराच्या लंगरसाहिबमधील संशयित असलेल्या रुग्णांना क्वारंटाईन ठेवण्याऐवजी त्यांना सोडून दिलेली चूक नांदेडकरांच्या मुळावर उठणारीच म्हणावे लागेल. त्या चार बेपत्ता कोरोनाग्रस्तांमुळे रुग्णांची संख्या कितीने वाढणार हा प्रश्न सर्वसामान्यांचे डोके चक्रावून सोडणारा ठरत आहे. प्रशासनाच्या अशा बेजबाबदार आणि गलथान कारभाराबद्दल नांदेडकरांमधून संताप व्यक्त होत आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सुरवातीला लॉकडाउनमध्ये वाखान्‍याजोगे काम केले. मात्र हळूहळू त्यात ढीलाई दिल्याने कोरोनाचे रुग्ण आढळु लागले. शहर व जिल्हा २० एप्रिलपर्यंत ग्रीन झोनमध्ये होता. त्यानंतर नांदेडमधील पीरबुर्‍हाण नगर भागातून एक ६४ वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आला. त्यानंतर २८ रोजी सेलूची महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. या दोघांचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असताना प्रशासनाने खबरदारी घेणे अपेक्षीत होते. त्यानंतर पंजाब येथे यात्रेकरूंना सोडण्यासाठी गेलेला चार चालकांना कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले.

हेही वाचा Video :  जिल्ह्यात लॉक डाऊन शिथिल नाही - जिल्हाधिकारी डाॅ. विपीन

पंजाबहून आलेल्यांची तपासणी केली नाही

पंजाब येथून ७९ खासगी बसेस घेऊन नांदेड येथे दाखल झालेल्या त्याचालक व अन्य अधिकारी यांच्या बाबतीत दाखविणे गरजेचे होते. त्या सर्व चालक व सोबत असलेल्या अधिकाऱ्यांची तपासणी केली असती तर कोरोनाची लागन नेमकी कशी झाली ते प्रशासनाला समजले असते. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करणे ही घोड चूकच केली. 

जिल्हा प्रशासनाने मोठी अबदा ओढावून घेतली

येथून पंजाब येथे गेलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पंजाब सरकारकडून महाराष्ट्र सरकारला रोज आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात आहे. तेथील आरोग्यमंत्री ही आपल्या सरकारचा निषेध नोंदवित असून नुकसानाची दावा ठोकण्याची भाषा बोलू लागले आहेत. यावर नांदेड प्रशासन असो, किंवा सरकारमधील कोणालाही अद्याप उत्तर देता आले नाही. जिल्हा प्रशासनाने मोठी अबदा ओढावून घेतली. त्यामुळे देशपातळीवर महाराष्ट्र सरकारची बदनामी सहन करावी लागत आहे. प्रशासनाचा बिनडोक कारभार राज्य सरकारला देशपातळीवर तोंडघसी पाडणारी ठरत आहे.

येथे क्लिक कराजंगलातील बंदूकधारींना समजले नक्षलवादी, पण पुढे काय झाले वाचा...

मोबाईल नंबर व पत्ता अचुक घ्यायला पाहिजे होता

प्रशासन इतकेच चूक करून थांबले नाही. त्यापलिकडे जाऊन पुन्हा गंभीर चूक करून ठेवली आहे. ती नांदेडकरांच्या मुळाशी उठणारी ठरत आहे. शनिवारी ज्या वीस जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले, अशांना अहवाल येईपर्यंत नजरकैदेत ठेवणे अपेक्षीत होते. त्या वीसच्या वीस जणांना सोडून मोकळे झाले. बरे ही सोडून देताना त्यांचे मोबाईल नंबर व पत्ता तरी नोंद करून घ्यायला हवा होता.

कोरोनाग्रस्तांची शोधमोहीम सुरु

या प्रकारामुळे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना गुरुव्दारा परिसरात जाऊन शोध मोहिमेत लक्ष घालावे लागले. त्यामुळे सोळा जण हाती लागले. अन्यथा ते ही इतर चार जणांसारखे बेपत्ता होऊ शकले असते. अद्याप त्या चार बेपत्ता झालेल्या कोरोनाग्रस्ताचा ४८ तासांपेक्षा अधिक काळ लोटला, तरी पोलिसांना पत्ता लागू शकला नाही. कोरोनाग्रस्तांची शोधमोहीम सुरु असल्याचे वजिराबाद पोलिस ठाण्याचे संदीप शिवले यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandedkar anxious: 'They' four positive patients are missing nanded news