जंगलातील बंदूकधारींना समजले नक्षलवादी, पण पुढे काय झाले वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

रिठ्ठा (ता.किनवट) गावच्या पैनगंगा नदीकाठच्या जंगलात बंदूकधारी आले अन् ते नक्षलवादी असल्याच्या अफवेला रविवारी (ता.तीन) सकाळी दहा वाजेच्या सुमारास पेव फुटले. या अफवेमुळे परिसरातील ग्रामस्थांसह पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. सखोल चौकशीनंतर ते नक्षलवादी नसून तेलंगणातील पोलिस असल्याचे निष्पन्न झाले. कोम्बिंगसाठी हे बंदूकधारी पोलिस या जंगलात आल्याचा खुलासा झाल्याने ग्रामस्थ आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.

इस्लापूर ः किनवट तालुक्यातील काही भाग हा जंगल क्षेत्राचा आहे तर याच परिसरात तेलंगणा राज्याची सीमा आहे. यामुळे या भागात महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातील पोलिसांची नेहमीच करडी नजर असते. या ठिकाणी रिठ्ठा येथील पैनगंगा नदीकाठच्या जंगलात असा प्रकार घडला, ज्यात जंगलात काही बंदूकधारी आले अन् ते नक्षलवादी असल्याच्या अफवेला पेव फुटले. प्रत्यक्षात मात्र ते निघाले तेलगंणातील पोलिस. यानंतर ग्रामस्थ आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. 

रविवारी (ता.तीन) रात्री दोनच्या सुमारास दोन लक्झरी बसेस रिठ्ठा गावातून जंगलातील पैनगंगा नदीकडे गेल्याचे काहींनी सांगितले. त्यानतंर रिठ्ठा जंगलातील पैनगंगा नदीकाठी असलेल्या एका शेतकऱ्याच्या जागलीवर काही बंदूकधारी गेल्याने हा प्रकार उघडकीस आला. ही माहिती परिसरात समजताच नक्षलवादी असल्याच्या अफवेला पेव फुटले. 

हेही वाचा - समन्वयाच्‍या अभावामुळे अडचणीत वाढ...कुठे ते वाचा...

वरिष्ठ पोलिस अधिकारी जंगलात दाखल 
घटनेची माहिती इस्लापूर पोलिसांना कळताच सहायक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे, पोलिस उपनिरीक्षक एस.एस.कांदे यांनी तातडीने परिटी, रिठ्ठा येथे प्रत्यक्ष जात खात्री केली. तसेच घटनेची माहिती त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देताच किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक हे तातडीने रिठ्ठा येथील जंगलात दाखल झाले. 

हेही वाचा - नांदेड @३१ : आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, ‘सारी’चाही वाढला धोका

चौकशीत समजले सत्य 
सहायक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे, पोलिस उपनिरीक्षक कांदे व रिठ्ठा येथील प्रतिष्ठित नागरिक सुंदर मुंडावरे यांनी शोधमोहीम सुरु केल्यावर दोन बंदूकधारी आढळून आले. त्यांच्याजवळ चौकशी केली असता आम्ही तेलगंणा राज्यातील पोलिस असून आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेवरुन या जंगलात कोम्बिंगसाठी आलो आहोत, असा खुलासा करुन त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधुन दिल्याने हे तेलंगणाचे पोलिस असल्याचे निष्पन झाले, अशी माहिती ठाणेदार सुशांत किनगे यांनी दिली. 

या परिसरात कोम्बिंग कशामुळे ते समजले नाही
परिसरातील ग्रामस्थांसह पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. अफवेमूळे मात्र, सगळ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. तेलगंणाचे पोलिस या जंगलात कशासाठी कोम्बिंग करत आहेत, याची माहिती मात्र मिळू शकली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The gunmen in The Forest Understood The Naxals, But Read What Happened Next ...nanded news