नांदेडकरांनो कोरोनाला घाबरू नका, स्वतःहून स्वॅब द्या 

अभय कुळकजाईकर
Wednesday, 12 August 2020

नांदेड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या तीन दिवसापासून शहरातील विविध भागात असलेले व्यापारी, दुकानदार तसेच त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी, कामगार, मुनीम यांची ॲन्टीजेन रॅपीड टेस्टद्वारे तपासणी करण्यात येत आहे. तीन दिवसात एकूण २१९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. 

नांदेड - नांदेडकरांनो कोरोना संसर्गाला घाबरू नका, अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे वाटल्यास लगेचच स्वतःहून स्वॅब द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपले आणि कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवा, असे आवाहन नांदेड महापालिकेच्या वतीने बुधवारी (ता.१२) करण्यात आले. 

नांदेड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या तीन दिवसापासून शहरातील विविध भागात असलेले व्यापारी, दुकानदार तसेच त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी, कामगार, मुनीम यांची ॲन्टीजेन रॅपीड टेस्टद्वारे तपासणी करण्यात येत आहे. सोमवारी (ता. दहा) एक हजार व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली त्यात ५४ जण पॉझिटिव्ह आढळले तर मंगळवारी (ता. ११) एक हजार २३६ जणांच्या तपासणत ८६ जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. बुधवारी (ता. १२) एक हजार १८४ जणांची तपासणी केली त्यात ७९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. असे तीन दिवसात एकूण २१९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. 

हेही वाचा - नांदेडला मृत्यूदर कमी करण्यासाठी सामुहिक प्रयत्न

नवा मोंढा भागात तपासणी
नवा मोंढा भागात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी भवनात या भागातील व्यापारी, खते, बी-बियाणे आदी दुकानदारांच्या व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचारी, कामगार, हमाल, मुनीम आदींचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्वॅब घेण्यात आले. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, सभागृह नेते वीरेंद्रसिंग गाडीवाले, स्थायी समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नगरसेवक किशोर स्वामी, माजी उपमहापौर उमेश पवळे, नगरसेवक प्रशांत तिडके पाटील, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, सहायक आयुक्त डॉ. मिर्झा बेग, सखाराम तुप्पेकर, व्यापारी मधुकर मामडे, विपीन कासलीवाल, प्रवीण कासलीवाल, डॉ. विक्रम रामतीर्थे, सुदर्शन आदमनकर, नरेंद्र आनरे, पाशा शेख आदी उपस्थित होते. 

आयुक्तांनी केले आवाहन
यावेळी आयुक्त डॉ. लहाने यांनी कोरोना संसर्गासंदर्भातील माहिती देऊन नागरिकांनी स्वतःहून स्वॅब देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. माजी सभापती स्वामी यांनी नागरिकांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी; तसेच अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिल्यास काळजी घेण्याचे आवाहन केले. 

हेही वाचलेच पाहिजे - या भाजीच्या उत्पन्नापासून मिळू शकतात भरपूर पैसे; शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग

बुधवारी ७९ व्यापारी पॉझिटिव्ह 
गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील विविध भागांत पाच पथकांद्वारे दुकानदार, व्यापारी व त्यांच्याकडील कर्मचारी, कामगारांची चाचणी करण्यात येत आहे. बुधवारी एकूण एक हजार १८४ जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्यात आली. त्यात ७९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. नवा मोंढा येथे १८७ जणांमध्ये १२ आढळून आले. सिडकोत ९७ पैकी पाच, नाना-नानी पार्क येथे २८६ पैकी ३३, चक्रधर नगरला २३० पैकी १३, कापड मार्केटला दोनशेपैकी दहा, संतकृपा मार्केटमध्ये १४९ पैकी तीन तसेच खासगी रुग्णालयात २८ पैकी तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandedkars, don't be afraid of Corona, give yourself a swab, Nanded news