Video - गाव जवळ केले, पण ग्रामस्थांनी दूर केले, तान्ह्या बाळाचे होताहेय हाल...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

लॉकडाउनमुळे हाताला काम नाही. त्यामुळे गावासून कोसो दूर गेलेले कामगार गावी परत येत आहेत. मात्र, त्यांना विलगीकरणात रहावे लागत असून, अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.  

नांदेड : ‘‘पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही आमचे गाव सोडले. परंतु, लॉकडाउनमुळे आमचा रोजगार हिरावला गेला. परिणामी, पुन्हा आमच्या गावी बिऱ्हाडासह आलो. परंतु, आम्हाला गावात प्रवेश दिला नाही. गावाबाहेरील शाळेमध्ये आम्हाला ठेवण्यात आले. मात्र, तेथे कुठल्याच प्रकारची व्यवस्था नसल्याने आमच्याच गावात मरणयातना आम्हाला सहन कराव्या लागत आहेत’, असा संताप कामठा बु.(ता.अर्धापूर) येथे नाशिक, मुंबई, पुणे येथून आलेल्या कामगारांनी व्यक्त केला.

पोटाची खळगी भरण्यासाठी नाशिक, पुणे, मुंबई आदी ठिकाणी गेलेले गावकरी आपापल्या गावी बाडबिस्तारासह परत येत आहेत. कामठा येथेही १४ कुटुंबीय परत आले असून, या सर्वांना गावाबाहेरीत बसवेश्‍वर विद्यालयामध्ये विलगीकरणात ठेवले आहे. कुटुंबामध्ये लहान मुलेही आहेत. मात्र विलगीकरण केलेल्या ठिकाणी व्यवस्था नसल्याने अनेक समस्या भेडसावत आहे. यात लहान मुलांसह महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. लाईट, फॅन नसल्यामुळे डासांशी सामना करावा लागत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने फवारणी केलेली नसल्याने डेंग्यू, मलेरियासारखा आजार बळावण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा - वेदनादायक : उपचाराला पैसे नसल्यामुळे तरुणीची आत्महत्या

कामगारांचा प्रश्‍न गुंतागुंतीचा
केंद्र सरकार स्थलांतरित व अस्थलांतरित कामगारांच्या विरोधात निष्ठुरपणे धोरणे रेटत आहे. देशभरात लाखो मजूर, कामगारांचा रोजगार हिरावला गेल्याने त्यांना अन्नासाठी दाहीदिशा हिंडावे लागत आहे. त्यांच्याकडे खायला अन्न नाही की घरापर्यंत पोहचण्यासाठी पैसे नाहीत. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणे त्यांच्यासाठी मोठे जिकीरीचे बनले आहे. एवढे होऊनही सरकार त्यांच्या समस्यांकडे मात्र साफ दूर्लक्ष करत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने स्थलांतरित मजूर, कामगारांचा प्रश्‍न दिवसेंदिवस  गुंतागुंतीचा होत आहे. 

हे देखील वाचा - नांदेड रेल्वेच्या रेसुबची सवारी बुलेटवर, गुन्हेगारांमध्ये धडकी

जिल्हा प्रशासनाचे सहकार्य करावे
जिल्हा प्रशासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. ग्रामपंचायत पातळीवर शक्य होईल तेवढी मदत गावी परतलेल्या कुटुंबियांना करत आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदारांनी कामठाच नाहीतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायंतींना सहकार्य करायला पाहिजे. दरम्यान बुधवारी विलगीकरणातील कामगारांना पीठ, तेल देवून त्यांची तपासणी केली आहे. सात दिवसानंतर त्यांना प्रमाणपत्र देवून घरी जाऊ देणार आहे. 
- शिवलींग स्वामी, सरपंच कामठा बु.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Near The Village But the Villagers Removed It The Baby Is Still Nanded News