अवांतर वाचनानेच येते शहाणपण : डॉ. सुरेश सावंत

प्रमोद चौधरी
Sunday, 25 October 2020

आजही काही शिक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात वाचनसंस्कृतीच्या आणि लेखनसंस्कृतीच्या विकासासाठी भन्नाट उपक्रम राबवितात. मात्र, हे काम सर्व शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे.

नांदेड : ज्ञान मिळावे यासाठी आपण सर्वजण मुलांना शाळेमध्ये पाठवतो. परंतु, आपल्या मुलाला ज्ञानतर मिळालेच पाहिजे; शिवाय शहाणपण येण्यासाठी अवांतर वाचनाची गोडी त्याच्यामध्ये रुजविण्याची आज खरी गरज आहे. सोशल मिडियाच्या जमान्यामध्ये वाचनसंस्कृती लुप्त होत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

डॉ. सुरेश सावंत यांनी सांगितले, की संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एकदा म्हणाले होते, ज्ञान आणि शहाणपण यात अंतर आहे. शिक्षणाने ज्ञान मिळते आणि अवांतर वाचनाने शहाणपण येते. समृद्ध समाजासाठी शहाणपण हवे आणि त्यासाठी वाचन हवेच. यशवंतरावांनी दूरदृष्टीने सांस्कृतिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. सुसंस्कृत मराठी समाज घडावा, यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळांची स्थापना केली. बहुजन समाजातील नवशिक्षितांसाठी ग्रंथांचे भांडार उघडे केले. त्या भांडारात आज कितीजण डोकावतात, हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा - नांदेड : केळीचे दर पुन्हा घटल्याने शेतकरी अडचणीत

शाळेतील ग्रंथालये झालीत कब्रस्ताने
आजची शालेय ग्रंथालये म्हणजे पुस्तकांची कब्रस्ताने बनली आहेत. ग्रंथालयातील पुस्तकांची कपाटे किंवा पेट्या या पुस्तकांच्या शवपेट्या बनल्या आहेत. हे चित्र जितके दुर्दैवी आहे, तितकेच ते संतापजनकही आहे. हे चित्र सार्वत्रिक असले, तरी ते शतप्रतिशत खरे नाही. जशी काळ्याकुट्ट ढगालाही रुपेरी किनार असते, तशी या नकारात्मक परिस्थितीलाही सकारात्मकतेची इवलीशी का होईना, पण सोनेरी किनार आहे. सर्व काही संपले आहे, असे समजण्यासारखी निराशाजनक परिस्थिती अजून आलेली नाही.  

हे देखील वाचा - कोरोना बाधिताचे प्रमाण केवळ सहा टक्के ; शनिवारी १८९ रुग्ण कोरोनामुक्त ः ७६ जण पॉझिटिव्ह

जाणीवजागृतीसाठी प्रभावी घोषवाक्ये हवेत
अजूनही बहुसंख्य शिक्षक असे आहेत की, त्यांना कामाशिवाय करमतच नाही. अशी ‘वर्कोहोलिक’ माणसे सदासर्वदा कामामध्येच आनंद शोधत असतात. आपल्याकडे शाळेमध्ये वर्षभर विविध दिनविशेष साजरे होत असतात. काही उपक्रमांच्या निमित्ताने शाळा प्रभातफेऱ्या काढत असतात. अशा प्रभातफेरीत विद्यार्थी जनजागृतीसाठी त्या दिवसाला अनुसरून घोषणा देतात किंवा घोषवाक्ये उच्चारतात. काही विद्यार्थ्यांच्या हातात घोषवाक्यांचे लक्षवेधक फलकही असतात. काव्यमय, नाट्यमय, अल्पाक्षरी, आलंकारिक, श्रवणसुलभ आणि परिणामकारक घोषवाक्ये या प्रभातफेरीचे आकर्षण ठरतात. चांगली घोषवाक्ये ओठांवर खेळतात. गळ्यात रुळतात. कल्कपकतेअभावी काही घोषवाक्ये निरर्थक आणि निरुपयोगी ठरतात. सगळ्या चळवळींसाठी, अभियानासाठी, उपक्रमांसाठी, प्रकल्पांसाठी, जाणीवजागृतीसाठी प्रभावी घोषवाक्यांची नेहमीच वानवा जाणवते.

 हल्ली शिक्षक वाचत नाहीत, विद्यार्थी वाचत नाहीत, अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते. पण अशी ओरड करणारे लोक तरी किती आणि काय वाचतात? हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.
- डॉ. सुरेश सावंत (ज्येष्ठ बाल साहित्यिक, नांदेड)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Need To Create Extra Reading Skills In Students Nanded News