नांदेड महापालिकेच्या हद्दवाढीवरुन राजकारण नको; विकासावर व्हावी चर्चा

नांदेड वाघाळा महापालिकेच्या परिसरात क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे ही वाढ, वाढती लोकसंख्या व विकास विचारात घेता महापालिकेची हद्दवाढ करणे आवश्यक असल्याचे काही जणांचे मत आहे.
महापालिका नांदेड
महापालिका नांदेड

नांदेड ः नांदेड वाघाळा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हद्दवाढीचा ठराव सत्ताधारी कॉँग्रेसने मंजूर केला. भारतीय जनता पक्षाने हद्दवाढीला विरोध केला तर शिवसेनेने वाडीला स्वतंत्र नगरपंचायत करण्याची मागणी केली. आता या बाबत चर्चा आणि आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. सर्वसामान्य नांदेडकरांनी मात्र हद्दवाढीवरुन राजकारण नको तर नांदेडच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा आणि निर्णय व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

नांदेड वाघाळा महापालिकेच्या परिसरात क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे ही वाढ, वाढती लोकसंख्या व विकास विचारात घेता महापालिकेची हद्दवाढ करणे आवश्यक असल्याचे काही जणांचे मत आहे. विशेष म्हणजे राज्यात नांदेड असे एक शहर असेल की ज्या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर डाव्या बाजूला महापालिका आणि उजव्या बाजूला ग्रामपंचायत आहे. याचे वाडी हे उदाहरण देता येईल. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासूनच महापालिका हद्दवाढीचा विषय प्रलंबित आहे. शहराचा चौफेर विकास होत असताना आणि अनेकजण ग्रामपंचायत हद्दीत जाऊन रो हाऊस, प्लॉट, फ्लॅट घेत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा - कोंढा (जि. नांदेड) येथील जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली.

विकासावर हवा भर

महापालिकेत कॉँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे कॉँग्रेसने हद्दवाढीचा विषयाला हात घालत हा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. ग्रामपंचायतीमध्ये अजूनही अनेक ठिकाणी रस्ते, नाल्या आणि पथदिव्यांचीही सोय झाली नाही. त्यामुळे त्या भागातील नागरिक मुलभुत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळेच काही भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत असो की महापालिका आधी आमच्या भागाचा विकास करा, अशी मागणी केली आहे.

असे आहे महापालिकेचे क्षेत्र....

- नांदेड नगरपालिकेचे १९९७ च्या आधी क्षेत्र- २०६२. ४८ हेक्टर

- १९९७ मध्ये नांदेड वाघाळा महापालिका झाल्यावर वाढीव दहा गावांसह क्षेत्र - ३११४. १८ हेक्टर

- २००९ मध्ये महापालिकेत तीन गावांचा समावेश- तरोडा खुर्द- ५६९.२७ हेक्टर, तरोडा बुद्रुक- ३९८. ४८ हेक्टर, ब्रह्मपुरी उर्वरित- २०० हेक्टर

- सध्याचे महापालिकेचे एकूण क्षेत्र - ६३४४. ४१ हेक्टर

येथे क्लिक करा- पिक विम्यासाठी नायगाव तालुक्यातील शेतकरी पुत्र पोहचले कृषी आयुक्ताकडे

असा झाला महापालिकेत समावेश

नांदेड वाघाळा महापालिकेची स्थापना ता. २६ मार्च १९९७ रोजी झाली. सुरवातीला नांदेड, असदुल्लाबाद, वजिराबाद, जंगमवाडीचा काही भाग, सांगवीचा काही भाग आणि ब्रह्मपुरीचा काही भाग नांदेड नगरपालिकेत होता आणि त्याला शहर विकास योजना मंजूर होती. त्यानंतर महापालिका झाल्यावर दहा गावे समाविष्ट झाली. त्यात वाघाळा नगरपालिका, वसरणी, असर्जन, फत्तेजंगपूर, असदवन, रहिमपूर, म्हाळजा, जंगमवाडीचा उर्वरित भाग, सांगवीचा उर्वरित भाग समाविष्ट झाला. ता. एक जुलै २००९ मध्ये तरोडा खुर्द आणि तरोडा बुद्रुकचा तसेच ता. २० आॅगस्ट २००९ मध्ये ब्रह्मपुरीचा उर्वरित भागाचा समावेश करण्यात आला. आता या १३ गावांची शहर विकास योजना (वाढीव क्षेत्र विकास योजना) २०१५ पासून सुरुच आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com