‘कोरोना’ने केली दुबळी माझी झोळी; भटक्यांची कैफियत

loha.jpg
loha.jpg


लोहा, (जि. नांदेड) ः शहरातील शिवाजी चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर एक वस्ती आहे. हुशार चित्रकाराने कुंचल्यातून चित्रावित अशी रंगीबेरंगी पसरलेली पालं. चार पैसे गाठीला मिळविण्यासाठी भल्या सकाळी त्या वस्तीतल्या सोळा ते वीस-बायका गोळा होतात. डोईवरती बाळी बुगडीचे खास अलंकार असलेले बोचके घेऊन लगबगीने रस्ता पार करतात, पण कोरोना संसर्गजन्य आजारामुळे खेडेगाव जवळ करता येत नाही. दोन महिने संपले, घरात किती दिवस काढायचे. गावगाड्यातील माणसं आम्हाला फिरकू देत नाहीत. पोटासाठी साधी भीकही मागता येत नाही. कोरोनाने झोळी दुबळी केली, अशी आर्त भावना भटक्याचे मुखिया दिगंबर गिरी हा ‘सकाळ’शी सांगत होता.

साठीकडे झुकलेला ऊमदा

व्यथा मांडतांना तो म्हणाला, गडीमाणसं मग थोड्या वेळाने एक तर शिकारीला जातात, नाही तर सुगंधी अत्तर घेऊन कुठलीशी वस्ती गाठतात. आत्ता कुठे तशी मनाजोगी शिकारही मिळत नाही. खायचे वांदे पडायला लागलेत. भटकंतीमुळे डोंगर माथा तोंडपाट झालेला. या भटक्यांची तुळजापूरच्या भवाणीवर प्रचंड श्रद्धा. राजस्थानी नि बंजारा मिश्र बोलीभाषेचा लहेजा घेऊन सतत भटकंतीत रममान होतात. जिभेत साखर घेऊन जन्माला आलेली ही माणसं परिस्थितीशी जुळवून घेतात. या सगळ्यांमधून उठावदार एक व्यक्ती भेटली. अत्यंत नम्र असलेला. अंगकाठी शिडशिडीत. ऊर्जावाही अंगात भगवा कुर्ता. साठीकडे झुकलेला ऊमदा, साहशी नि सदा आनंदी चेहरा वृत्तीप्रमाणे नाव ही दिगंबर, कशाचाच सोस नाही. त्या वस्तीचा अघोषित प्रमुखच म्हणा ना !

नित्यनेमाने नमस्कार ठरलेलाच
भल्या सकाळी नित्यनेमाने नमस्कार ठरलेलाच. कुटुंबवत्सल, निगर्वी कसलीही हाव नसलेला. प्रारंभी लोकांनी कोरोना आपत्तीत धान्याची मदत केली. ही मदत कुठपर्यंत पुरेल! लालसर गौर वर्ण, बारीकसे डोळे, काळे भुरे केस, तरीही पांढरे शुभ्र दात दाखवत हसत, चमकदार डोळ्यांनी कुणालाही आकर्षित कयावं असं व्यक्तिमत्व. भटक्यांच्या जीवन प्रवासाप्रती आणि अनुभवाप्रती सहानुभूती आहे. ती यवढी असावी आपल्याकडे. लोकं दुसऱ्याबद्दल तिरस्कार निर्माण करतात. आपण तेवढे चांगले बाकी.


असं निर्दयी असू नये माणसाने 
तो सांगू लागला, ‘खूप सोसलंय, खूप भोगलंय. आता पोरं - बाळं मोठी झाली. सुना - नातवंडं आली. गावोगावी जाऊन बाळी बुगडी विक्री करतो. कोरोना संसर्गजन्य रोग आला, धंद्यात राम राहिला नाही.’ असं काही बाही तो सांगत होता. तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण कुमार डोंगरे यांनी त्यांना गायरान जमिनीत घरकुल उभारून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांची अचानक बदली झाल्यामुळे भटक्यांचे स्वप्नातील घर स्वप्नातच राहिले आहे. शासनाने गायरान जमीन उपलब्ध करून घरकुल बांधून द्यावेत, अशी मागणी भटक्यांच्या नागरिकांतून होत आहे. दिगंबर गिरी सांगत होता. दोन मुले, दोन मुली, नातवंडं असा संसार. गप्पांमधून एक रूखरूख जाणवली. स्वत:चं असं एक मजबूत घरकुल करून दाखवण्याची त्याची ईच्छा आहे. आहे त्या परिस्थितीतून वर येण्याची त्यांची तळमळ आहे. त्याला बघून वाटतं ‘आयुष्य सुंदर आहे... फक्त डोळ्यात स्वप्नं हवीत’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com