आता लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणाकडे, अर्धापूरातील 43 गावात लवकरच मिळणार नवीन कारभारी

लक्ष्मीकांत मुळे
Tuesday, 19 January 2021

आता निवडून आलेल्या सदस्यांचे लक्ष सरपंचपदाच्या सोडतीकडे लागले आहे. सरपंचपदांचे आरक्षण कोण्या प्रवर्गासाठी जाते या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी झाल्यावर आगामी पाच वर्षाच्या काळात गावकारभारी कोण राहणार हे स्पष्ट झाले आहे. आता निवडून आलेल्या सदस्यांचे लक्ष सरपंचपदाच्या सोडतीकडे लागले आहे. सरपंचपदांचे आरक्षण कोण्या प्रवर्गासाठी जाते या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तर प्रत्येक राजकीयपक्ष आमच्याच पक्षाची सरशी झाल्याचा दावा करित आहे.

अर्धापूर तालुक्यासह जिल्हातील एक हजार ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. ग्रामपंचायत निवडणूक होण्याआधी प्रवर्गनिहाय सरपंचपदांचे आरक्षण घोषित झाले होते. पण सरपंचपदाचे लिलाव झाल्याच्या घटना समोर आल्यामुळे सरपंचपदांचे आरक्षण रद्द करून निवडणुक झाल्यावर आरक्षण घोषित करण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने घेतला.

सरपंचपदांचे आरक्षण काय निघेल या बाबत निवडून आलेल्या सदस्यांना व पॅनल प्रमुखांना उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज संस्थेत पन्नास टक्के महिला राखीव जागा असतात. तसेच अनुसुचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण काढण्यात येते.

हेही वाचाहिंगोलीत राधा जिनिंगला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांच्या कापसाचे नुकसान

अर्धापूर तालुक्यातील 43 तर जिल्हात एक हजार ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया मतमोजणी झाल्यावर संपली आहे. आत्ता सरपंचपदांचे आरक्षण घोषित करून सरपंचपदांची निवडणूक घेणे बाकी आहे. मतदारांना प्रस्थापितांना धक्का देत गावाचा कारभार तरुणांच्या हाती दिला आहे. या निवडणुकीत खुप मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद आदीं वापर करुन विजय मिळविला आहे. हा विजय आरक्षणामुळे वाया जावू नये अशी चिंता पॅनलप्रमुखांना लागली आहे. तसेच सरपंचपदांची निवड होईपर्यंत सदस्यांना सांभाळावे लागणार आहे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये काठावरचे बहुमत आहे. अशा ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची फोडाफोडी, घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपक्ष सदस्यांना विशेष महत्व आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the focus is on the reservation of Sarpanchpada, new stewards will soon be found in 43 villages in Ardhapur nanded news