कंधार तालुक्यात कोरोनाबाधित संख्या पोहचली तीनशेच्या पार

हफिज घडिवाला
Tuesday, 8 September 2020

गेल्या अडीच-तीन महिन्यांत कंधार तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. सोमवारी (ता.सात) कोरोनाबाधितांची संख्या ३०८ वर पोहचली आहे.

कंधार (नांदेड) : एखाद्या दिवशी समाधान, तर लगेच दुसऱ्या दिवशी धक्का. कोरोनाच्या बाबतीत असे वर्णन केले, तर चुकीचे ठरणार नाही. दिवसेंदिवस कंधार तालुक्यावर कोरोनाची पकड घट्ट होत चालली आहे. नागरिकांचा बिनधास्तपणा याला कारणीभूत असून, गेल्या अडीच-तीन महिन्यांत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. सोमवारी (ता.सात) कोरोनाबाधितांची संख्या ३०८ वर पोहचली. एवढ्या मोठ्यासंख्येने रुग्ण बाधित होऊनही नागरिकांची वागणूक मात्र ‘जैसे थे’च आहे. नागरिकांनी आपल्या राहणीमानात बदल न केल्यास कोरोनाचा उद्रेक अटळ आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

कोरोनाचे प्रमाण आता जवळपास सर्व शहरामध्ये वाढले आहे. प्रत्येक गल्ली, मोहल्ला आणि नगरामध्ये कोरोनाने प्रवेश केला आहे. ग्रामीण भागातील ४० ते ५० गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पूर्वी अँटीजेन तपासणी पथकातील कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांना कोरोनाची लागण झाली होती. आता पेठवडज (ता. कंधार) येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, चालक आणि कर्मचाऱ्यांचे दोन नातेवाईक बाधित झाले आहेत. आरोग्य क्षेत्रात काम करणारे अधिकारी, कर्मचारी पॉझिटिव्ह आढळत असल्याने आरोग्य विभागात घबराट पसरल्याचे चित्र आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग आदीबाबत आवाहन करून जनतेला जागरूक केले जात आहे; परंतु शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकावर याचा फारसा परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. काहीजण नियमाचे पालन करीत आहेत. हे अपवाद सोडले, तर बहुतांश नागरिक बिनधास्तपणे वागत आहेत. नागरिक तर नागरिक प्रशासकीय यंत्रणाही आता सैल पडल्याचे दिसते आहे. नागरिकांना गांभीर्य नाही म्हणावे, तर यंत्रणेला सुद्धा कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव कमी होण्याऐवजी वाढत आहे. 

नागरिकांना शिस्त लावणे गरजेचे... 

कोरोना गाइड लाइनकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असेल, तर प्रशासनाने कठोर पावले उचलून नागरिकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता नुसत्या घोषणा करून भागणार नाही. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून प्रशासन सुरक्षित राहण्याचे, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्याचे आवाहन करतच आहे. पण याचा काहीच लाभ होत नसल्याचे चित्र आहे. लॉकडाउन, संचारबंदी, जनता कर्फ्यू लावून झाले. कोरोनाचा अटकाव झाला नाही आणि होणारही नाही. नागरिकांना शिस्त लावल्याशिवाय ते शक्यही नाही. प्रशासनाने कठोर होऊन नागरिकांना शिस्त लावली, तरच कोरोनाचा फैलाव रोखणे शक्य आहे. 

एक पीएसआय आणि तीन पोलिस बाधित... 

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाबरोबरच पोलिस प्रशासन तारेवरची कसरत करीत आहे. आरोग्य विभागात यापूर्वीच कोरोनाने शिरकाव केला होता. सोमवारी उस्माननगर (ता.कंधार) पोलिस ठाण्यातील एक पीएसआय आणि तीन पोलिस असे चारजण पॉझिटिव्ह निघाल्याने आरोग्य विभागासह आता पोलिस विभागातही घबराट पसरली आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients in Kandhar taluka has reached 308