किनवट-माहूर महामार्गावरील तीन दुचाकींच्या धडकेत एक ठार

Nanded News
Nanded News

किनवट (जि. नांदेड)  ः  तीन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या विचित्र अपघातात एक ठार, एक गंभीर तर एक जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी (ता.२४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास किनवट-माहूर महामार्गावर शांतीभूमी बौध्द स्मशानभूमी जवळ झाला. 

याबाबतची अधिक माहिती अशी की; शहरातील रंगवैभव कलेक्शन या कापड दुकानातील कर्मचारी निखिल ब्रम्हाजी गुंजकर (वय २४, रा.लोणी) एम.एच.२६/ बी.के. २४४८ या क्रमांकाच्या दुचाकीवरून शेतातून डबलसीट किनवटकडे येत होता, तर टी.एस.०१/ एफ.ए.२२०९ क्रमांकाची दुचाकी किनवटहून बाहेर जात होती. तीसरी दुचाकी साठेनगरातून किनवट - माहूर महामार्गावर येत होती. या तीनही गाड्यांची विचित्र टक्कर झाली. या अपघातात निखिल गुंजकर हा तरुण जागीच ठार झाला. 

तर रुद्राक्ष शंकर जल्लावार (वय २२, रा. साठेनगर) याच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला मोठी जखम झाल्याने गंभीर जखमी झाला आहे. समोरुन येणा-या  तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यातील इच्चोडा मंडळातील आडेगांव येथील चिटफंडचा कर्मचारी बलविरसिंग ठाकूर (वय ४०) हा किरकोळ जखमी झाला आहे. या घाईगर्दीत तीस-या दुचाकीस्वाराने पोबारा केल्याचे बघ्यांनी सांगितले आहे.

जखमींवर किनवट येथील सानेगुरुजी रुग्णालयात डॉ. अशोक बेलखोडे यांनी उपचार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुरली राठोड, आप्पाराव राठोड, श्री. एलकधरे, ज्ञानेश्वर डुकरे यांनी घटनेचा पंचनामा केला.

विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या 
नांदेड ः
 घरामध्ये भावासोबत एकटी असल्याची संधी साधून एका नराधमाने घरात घुसून या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हा अपमान सहन न झाल्यामुळे सदर मुलीने विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना मांडवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 

अधिक माहिती अशी की, रायपूरतांडा येथील सोळा वर्षिय अल्पवयीन मुलगी घरामध्ये लहान भावासोबत एकटीच होती. ही संधी साधून गावातीलच आरोपी अमोल इंदल राठोड (वय २३) तिच्या घरात वाईट हेतून घुसला. आणि तिचा हात पकडून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या कारणावरून अपमानित झालेल्या या मुलीने विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी आदिलाबाद येथे नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मांडवी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटकही करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com