esakal | केरळच्या जिल्हा न्यायाधीशाला आॅनलाइन गंडा; आरोपीला नांदेडमध्ये अटक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ही बाब श्री. पिन्सीपल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मंजेरी (जि. मल्लपूरम) पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी (ता. पाच) तक्रार दिली.

केरळच्या जिल्हा न्यायाधीशाला आॅनलाइन गंडा; आरोपीला नांदेडमध्ये अटक

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः केरळ येथील जिल्हा न्यायाधीशाला आॅनलाईन गंडा घालणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता. सहा) मध्यरात्री अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला मंजेरीच्या सायबर फॉरेन्सिक पथकाकडे सुपुर्द केले.

अधिक माहिती अशी की, मल्लपूरम (केरळ) येथील जिल्हा न्यायाधीश के. पी. जॉन पिन्सीपल यांचे नेटबॅंकींगचे डिटेल्स यूझर आयडी व पासवर्ड हॅक करुन आरोपी ओंकार संजय चातरवाड (वय १९, रा. कल्याणनगर, नांदेड) याने आपल्या साथीदारांसह एक लाख दोन हजार ६९१ रुपयांची आॅनलाईन खरेदी केली. सदर आॅनलाईन खरेदी कॅन्सल अॅप्लीकेशनचा वापर करुन ही रक्कम १२ आॅक्टोबर २०२० रोजी आरोपींनी आपल्या खात्यावर घेवून काढून घेतली.

ही बाब श्री. पिन्सीपल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मंजेरी (जि. मल्लपूरम) पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी (ता. पाच) तक्रार दिली. त्यानुसार मंजेरी पोलिस ठाण्याने आरोपी ओंकार संजय चातरवाड याचा शोध घेण्यासाठी नांदेडच्या पोलिस ठाण्याकडे मदत मागितली. त्यानुसार पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना आरोपीला शोधण्याची सूचना दिली. श्री. चिखलीकर यांनी एक पथक तयार केले.

हेही वाचा अशा लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले आहे

सदर पथकातील सहायक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आरोपी ओंकार चातरवाड हा दररोज रात्री आपल्या कल्याणनगर येथील स्वतःच्या घरी येवून सूर्योदय होण्यापूर्वी पळून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवारी रात्री पथकाने आरोपीच्या घराजवळ अंधारात दबा धरुन सापळा रचला. नेहमीप्रमाणे आरोपी ओंकार चातरवाड हा शनिवारी मध्यरात्री घरी येताच दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून मंजेरीच्या सायबर फॉरेन्सीक पथकाकडे सुपुर्द केले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सहायक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती, पोलिस उपनिरीक्षक आशिष बोराटे, सहायक पोलिस उपनिरीक्षक जसवंतसिंघ शाहु, अमलदार मारोती तेलंग, मोतीराम पवार, गणेश धुमाळ, रणधीरसिंह राजबंसी, बजरंग बोडके, विलास कदम, तानाजी येळगे, विठ्ठल शेळके, हनुमान ठाकूर यांनी केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे