धोरण निश्चिती म्हणजे पाण्याची टाकी; तर लोकप्रशासन पाईप लाईन

प्रमोद चौधरी
Thursday, 5 November 2020

शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात लोकप्रशासन अभ्यास मंडळातर्फे ‘सुशासन व प्रशासनातील तणाव व्यवस्थापन’  या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.   

नांदेड :  लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी धोरण निश्चित करण्याचे कार्य करतात; तर लोकप्रशासन अंमलबजावणीचे कर्तव्य निभावतात. धोरण निश्चिती म्हणजे पाण्याची टाकी; तर प्रशासन पाईपलाईन. प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणतेही कार्य करतांना कायद्याची चौकट ओलांडता येत नाही. मुख्य प्रशासकाच्या विचारांचा, वर्तनाचा प्रभाव सर्व कर्मचाऱ्यांवर पडत असतो. यथा प्रशासक; तथा कर्मचारी, असे विचार देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा. डॉ.बालाजी कत्रूवार यांनी व्यक्त केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे अध्यक्षीय समारोपात म्हणाले की, मानवी मेंदू जे संग्रह व कार्य करू शकते, ते तंत्रज्ञान करू शकत नाही. संपूर्ण आयुष्यभर वृद्धावस्थेपर्यंत विचार, घटना-घडामोडी, सुखदुःख या डाटाचा संग्रह मेंदू करत असते. त्यामुळे मेंदूतील धमन्यांवर जोर पडून तणाव निर्माण होत असतो. तणावाचे निराकरण करून सामान्य जीवन जगणे; हा आजच्या काळातील महत्त्वाचा विषय आहे. ताणतणावाचे व्यवस्थापन न केल्यास माणूस प्रभावशीलरित्या कार्य करू शकणार नाही.

हेही वाचा - लेकीचे कुंकू पुसणाऱ्या तलाठी बापास अटक- पोलिस अधीक्षक राकेश कलासागर

प्रा.डॉ. बालाजी कत्रूवार म्हणाले की, प्रशासकीय अधिकाऱ्यास अनेक स्तरावर कार्य करावे लागते. अधिकार्‍यांमध्ये अहंकार निर्माण झाला तर तणावात वाढ होते. कर्मचाऱ्यांमध्ये कार्यसंस्कृती वाढावयास हवी,नीतिमूल्यांची जपणूक झाली पाहिजे  तसेच कर्तव्य व जबाबदारीचे काटेकोर पालन केल्यास तणाव निर्माण होणार नाही. प्रशासनामध्ये नियोजन, कल्पकता व सकारात्मक दृष्टी असल्यास ताणतणावाचे निराकरण होऊन सुशासनाची निर्मिती होऊ शकेल.

हे देखील वाचाच - पाचशे परिचारिकांवर पुन्हा बेकारीची कुऱ्हाड , २० पैकी १४ शासकीय कोविड सेंटर बंद, जेवणही दिले जात नसल्याची तक्रार

आॅनलाईन व्याख्यानाला लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा. डॉ. मंजुश्री देशमुख, प्रा. डॉ. लेफ्टनंट रामराज गावंडे, प्रा. डॉ. मीरा फड, प्रा. डॉ. अजय गव्हाणे, प्रा. डॉ. नीरज पांडे, प्रा. डॉ. नीता जयस्वाल, प्रा. डॉ. अंजली गोरे, प्रा. डॉ. संजय नन्नवरे, प्रा. डॉ. धनराज भुरे, प्रा. डॉ. रमेश चिल्लावार, प्रा. डॉ. मंगल कदम, प्रा. डॉ. कविता सोनकांबळे, प्रा. डॉ. एम.ए.बशीर, प्रा. डॉ. मनोज पैंजणे, प्रा. डॉ. राजकुमार सोनवणे, प्रा. डॉ. संगीता कुलकर्णी, प्रा. डॉ. अजय मुठे, प्रा. डॉ. विश्वाधार देशमुख यांच्यासह शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Lecture At Yashwant College Nanded News