संविधानामुळेच संधी : कोयत्याऐवजी आता ऊसतोड महिलेच्या हाती खासदारांच्या गावचा कारभार ? चिखलीच्या ग्रामस्थांचा मतरुपी निकाल

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 19 January 2021

नांदेडच्या कंधारमधील चिखली गावातील रेखा गायकवाड या ऊसतोड महिलेला गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले आहे.

नांदेड : घरची परिस्थिती जेमतेम, मात्र एकदा गावच्या विकासासाठी ग्रामपंचायच निवडणूक लढवायची ही इच्छा मनात घेऊन निवडणूकीत उतरलेल्या एका ऊसतोड मजूर महिलेला गावकऱ्यांनी तिच्या जिद्दीला सलाम करत निवडून दिले. आता ऊसतोड कोयत्याऐवजी गावचा कारभार करण्याची गावकऱ्यांनी दिलेली संधी ही मी कदापी विसरणार नाही. हे चित्र नांदेडमध्ये चिखली (ता. कंधार) गावातील आहे. एक नवा पैसाही खर्च न करता ऊसतोड मजुरी करणाऱ्या रेखा गायकवाड ह्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.

जनमत पाठीशी असले की निवडणुका इतिहास घडवतात. हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. जिल्ह्यातील चिखली हे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मूळ गाव म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. या गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्पष्ट बहुमत खासदार चिखलीकर यांच्या गटाकडे आहे. मात्र याच गावात खासदारांच्या विरोधी गटांकडून विजयी झालेल्या रेखा बाबुराव गायकवाड यांच्या विजयाची देखील चर्चा होतेय.

हेही वाचानांदेड जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासाठी तयारी सुरु, नऊ हजार ५०० शिक्षकांची कोरोना चाचणी होणार

व्यवसायाने ऊसतोड कामगार महिला असलेल्या रेखा गायकवाड यांना चिखली गावकऱ्यांनी निवडून दिले. विशेष म्हणजे या गावचे सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेला सुटले तर त्या सरपंचपदाच्या एकमेव दावेदार आहेत. निवडणुकीला पैसाच खर्च करावा लागतो, असा समज या उदाहरणामुळे दूर होतो. गावकरी ज्याच्या पाठीशी त्याला नेतृत्व करायची संधी मिळते. हे या निमित्ताने सिद्ध होत आहे. एक ऊसतोड कामगार महिला ग्रामपंचायतीत जाऊन आपल्या गावाच्या प्रश्नांना वाचा फोडणार याचा चिखली इथल्या ग्रामस्थांना अभिमान आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunity only because of the Constitution: Instead of a scythe, now the management of the MP's village is in the hands of woman nanded news