गाव तेथे स्मशानभूमी अभियानांतर्गत पालकमंत्र्यांकडून जमीन प्रदान आदेश

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 27 January 2021

नांदेड जिल्ह्यातील या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन “गाव तेथे स्मशानभूमी, दफनभूमी” योजना हाती घेतली असून आज नांदेड तालुक्यातील चिखली, निळा, भोकर तालुक्यातील जांबदरी, धारजनी, मौ. चिचाळा या गावांना जमीन प्रदान आदेशाचे प्रातिनिधीक वाटपही केले.

नांदेड : जिल्ह्यातील असंख्य गावात आजही अंत्यविधीसाठी स्वतंत्र अशा जागा नसल्यामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकवेळा वंशपरंपरागत पद्धतीने ज्या जागेवर दहन किंवा दफन विधी केला जातो. स्मशानभूमीची जागा बऱ्याच गावांमध्ये खाजगी मालकीची असल्याने वादविवाद होतात. यात तक्रारी होत असल्याने बऱ्याचवेळा हा प्रश्न जटिल होतो. नांदेड जिल्ह्यातील या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन “गाव तेथे स्मशानभूमी, दफनभूमी” योजना हाती घेतली असून आज नांदेड तालुक्यातील चिखली, निळा, भोकर तालुक्यातील जांबदरी, धारजनी, मौ. चिचाळा या गावांना जमीन प्रदान आदेशाचे प्रातिनिधीक वाटपही केले.

याचबरोबर जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनासंदर्भात जर काही अडचणी असतील तर त्या शासनस्तरावर तात्काळ पोहोचाव्यात व त्यावर प्रशासनाला काम करणे सोईचे व्हावे या उद्देशाने प्रशासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ त्यांनी केला.  

ग्रामीण भागासह शहरातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी बचतगटांची भूमिका ही खूप मोलाची आहे. यादृष्टिने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नांदेड यांच्यामार्फत वेळोवेळी नाविन्यपूर्ण योजनांसाठी बचतगटांना प्रोत्साहित केले जाते. जिल्ह्यातील बचतगटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत उद्योग करणाऱ्या नांदेड येथील रमाई महिला बचतगट, करंजी (ता. हिमायतनगर) येथील जिजाऊ महिला बचतगट, तेजस्वीनी मसाला युनिट नांदेड, नाळेश्वर (ता. नांदेड) येथील अष्टविनायक महिला बचतगट यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्याचबरोबर नेहरु युवा केंद्रामार्फत स्वच्छ भारत समर इंटरशीप अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या युवकांचे त्यांनी अभिनंदन केले. याचबरोबर जिल्ह्यात  “बेटी बचाओ बेटी पढाओ” अभियानांतर्गत जी साक्षरता मोहिम घेतली आहे त्या मोहिमेचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कौतूक करुन पुस्तिकेचे प्रकाशन केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order to provide land from the Guardian under the village cemetery campaign there nanded news