शेतकरी जगला पाहिजे हीच आमची भूमिका : उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रमोद चौधरी
Friday, 27 November 2020

शेतकरी व कामगार जगला तरच महाराष्ट्र जगेल ही आमची प्रमुख भूमिका असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथे शुक्रवारी झालेल्या पदवीधर मेळाव्यामध्ये बोलताना सांगितले. 

नांदेड : ‘‘केंद्र सरकारने नुकतेच शेतकरी तसेच कामगारविरोधी कायदे तयार केल्याने देशात अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये हे कायदे आम्ही कदापीही लागू करणार नाही. कारण, शेतकरी व कामगार जगला तरच महाराष्ट्र जगेल ही आमची प्रमुख भूमिका आहे’’, असे मत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केले.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादी, कॉग्रेस व शिवसेनेचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांच्या प्रचार सभेमध्ये ते शुक्रवारी (ता.२७) बोलत होते. श्री. पवार म्हणाले की, महाराष्ट्र शासनाची सध्याची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे. असे असताना केंद्र शासनाकडे आमची २८ हजार ७०० कोटी रुपये येणे बाकी आहे, ती रक्कमही दिली जात नाही.

हेही वाचा - पुण्यातील कंपनीने घातला नांदेडच्या डॉक्टरला अडीच लाखांचा गंडा

शेतकरी जगला पाहिजे म्हणून आम्ही १० हजार कोटी रुपयांची मदत दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मदत दिली. राज्य शासन प्रत्येक टप्प्यावर मार्ग काढत आहे. हेच विरोधी पक्षाला सहन होत नसल्याने, आघाडी सरकारविरोधात काहीही बोलत सुटले आहेत. ‘मी पुन्हा येईन’, ‘दोन महिन्यात भाजपचे सरकार स्थापन’ होईल अशा थापा हे कार्यकर्त्यांना मारत आहे. परंतु, ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न बघूच नका, आम्ही पाच वर्ष सरकार चालवणारच असा उलटवार अजिवात पवार यांनी लगावला. 

हे देखील वाचाच - नांदेड : अंगावर पेट्रोल टाकून शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, भोकरच्या एसबीआय बॅंक समोरिल प्रकार

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षाच्या कानपिचक्या घेतल्या. दोन दिवसांपूर्वी भाजपचे विरोधी पक्षनेते नांदेडमध्ये आले होते. त्यांचे नांदेडवर खूप प्रेम आहे. ते म्हणाले की, आघाडी सरकार बोलबच्चन सरकार आहे. पण त्यांनी हे लक्षात घ्यावे की, आमच्यावर सध्या करत असलेले आरोप हे तंतोतंत तुम्हाला लागू होत आहेत. कोरोनाच्या कठीण काळातही आम्ही ११ हजार ५७६ कोटींचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. त्यामुळे आमच्यावर कितीही टिका केली, किंवा आमच्या विरोधात मतप्रवाह वळवण्याचा प्रयत्न केलातरी आम्हाला काहीच फरक नाही. येत्या तीन डिसेंबरला तुम्हाला ते समजेलच, असा टोला देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता अशोक चव्हाण यांनी लगावला. 

येेथे क्लिक करा - लोअर दुधनातून रब्बी पिकांना सुटणार पाणी- तेरा हजार हेक्टर जमिनीला मिळणार लाभ

व्यासपीठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम, माजी मंत्री अर्जुन खोतकर, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, बालाजी कल्याणकर, श्यामसुंदर शिंदे, माजी आमदार डी. पी. सावंत यांच्यासह कॉग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. 

हेतर वाचलेच पाहिजे - देगलूर येथे बारा तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही

पदवीधर निवडणूक जिंकायचीच 
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार स्थापन होताच कोरोना संसर्गाचे संकट देशासह राज्यावर आले. तरीही आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रीत करून कोरोनाला काहीअंशी प्रमाणात सद्यस्थितीत हरवले आहे. आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून पदवीधर मतदारसंघाची पहिली निवडणूक आहे. त्यामुळे आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी जोमाने काम करण्याचा मंत्रही अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Is Our Role That Farmers Should Live : Ajit Pawar Nanded News