esakal | ऐन उन्हाच्या कडाक्यामध्ये नांदेड जिल्हा परिषदेमधील पाणपोई झाली शोभेची वस्तू

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद, नांदेड
उन्हाच्या कडाक्यामध्ये नांदेड जिल्हा परिषदेमधील पाणपोई झाली शोभेची वस्तू
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगला गुंडले यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या परिसरात उभारण्यात आलेली पाणपोईची अवस्था सद्यस्थितीत ‘असून वळंबा...नसून खोळंबा’अशी झाली आहे. या पाणपोईत पाणी नसल्याने अनेकांना पाण्याविनाच परतावे लागत आहे.

मिनी मंत्रालय अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणात तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगला गुंडले यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेत कामासाठी येणाऱ्यांना नागरिकांना शुद्ध व शीतल जल मिळावे म्हणून आरओ पाणी फिल्टर मशीन बसविण्यात आली. परंतु, गत अनेक महिन्यांपासून या पाणी फिल्टर मशिनमध्ये पाणीच नसल्याने कामासाठी जिल्हा परिषदेत येणाऱ्यांना पाण्याविना परत जावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.

हेही वाचा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅन्टचा पाईप फुटल्याची घटना मंगळवारी (ता. 27) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील नागरिक कामानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये येतात. जिल्हा परिषदेमध्ये बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी मध्यंतरीच्या काळात प्रत्येक माळ्यावर वॉटर कुलर बसविण्यात आले होते. मात्र, हे वॉटर कुलरसुद्धा सद्यस्थितीत बंद अवस्थेतच आहेत. शिवाय प्रांगणात असलेली मोठी पाणपोई कुलुपबंद आहे. यामुळे बाहेरुन येणाऱ्यांना पाणी पिण्यासाठी जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावर असलेल्या एका उपहारगृहातच जावे लागत आहे. किंवा एखाद्या पदाधिकाऱ्याच्या दालनात ‘पाणी देता का पाणी...’असे म्हणण्याची वेळ आली आहे.

प्रभारी सीईओंनी दखल घ्यावी ः

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या प्रशिक्षणासाठी एक महिन्याच्या सुट्टीवर गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पदाचा प्रभारी कारभार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे आहे. सध्या कोरोना कहराचा काळ असल्याने जिल्ह्यात टाळेबंदी आहे. यामुळे सर्वच व्यवसायाचे ठिकाणे बंद आहेत. जिल्हा परिषदेमध्ये लस, आरोग्यसाहित्य नेण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी घरुनच आणावे लागत असल्याची बाब समोर येत आहे. म्हणून डॉ. विपीन यांनी बंद असलेल्या पाणपोईकडे लक्ष देऊन ती चालू करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे