Video- नांदेड आगारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा 

प्रमोद चौधरी
Monday, 14 September 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेवून प्रवाशी वाहतूक होणे आवश्यक आहे. मात्र, नांदेड बसस्थानकावर कुठल्याही प्रकार प्रवाशांसह वाहक व चालकांची खबरदारी घेतली जात नसल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. 

नांदेड : पाच महिन्यांपासून थांबलेली एसटीची चाके सुरु व्हावीत म्हणून अटी व शर्तीनुसार शासनाने एसटीला प्रवाशी वाहतुकीसाठी परवानगी दिली. परंतु, कुठल्याही प्रकारची खबरदारी न घेता, किंवा निर्देशाला हरताळ फासला जात आहे. परिणामी प्रवाशांसह वाहक व चालकांच्याही आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशी वाहतुक करण्याचे निर्देश देवून एसटी बसेस सुरु केल्या. थांबलेले अर्थचर्क पुन्हा सुरळीत सुरु व्हावे हा त्यामागचा उद्देश होता. परंतू बसेसमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम पाळल्या जात नसून फिजिकल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र बसस्थानकावर बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे मास्क व सॅनीटायझरचा अजिबात वापर होत नसल्याने संसर्ग वाढण्याची भिती निर्माण झाल्याचे काही वाहक व प्रवाशांनी सांगितले. 

हेही वाचा - स्थावर मिळकतीच्या दरात दोन टक्क्यांपेक्षा अधिक वाढ, क्रेडाई दरवाढीच्या पुनर्विचारासाठी शासनाला विनंती करणार

लॉकडाऊननंतर शासनाने एसटी बसेस सुरु करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्केनुसार प्रवाशांना सवलत देणे, तोंडावर मास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर करणे या अटीवर बस सेवा सुरु करण्यात आली. परंतु नांदेड जिल्ह्यात शासनाच्या या निर्देशाचे पालन होत नसून एका सीटवर दोन ते तीन प्रवाशी बसून प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांच्या तोंडाला मास्क बांधल्याचे दिसून येत नाही. एवढेच नाही तर एसटी बसेसमध्ये सॅनिटायझर उपलब्ध नसल्याने बसमध्ये गर्दी होवून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नांदेड आगार प्रवाशी तसेच चालक-वाहकांच्या जीवाशी खेळत असून मागील काही दिवसांपासून १०० टक्के प्रवाशी प्रवास करत आहेत. 

हे देखील वाचलेच पाहिजे - नांदेडची चिंता वाढली : ‘ऑक्सिजन कमतरतेमुळे रुग्णालयेच ‘ऑक्सिजनवर

नांदेड आगारात पंधराच्यावर कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे. परंतु, चालक वाहकासह इतर कर्मचाऱ्यांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यास वरिष्ठ अधिकारी पुढाकार घेत नसल्याने एसटी महामंडळात कोरोना बाधीत रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष द्यावे असे एका वाहकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passenger Not Securred The Nanded Bus Stand Nanded News