‘या’ ठिकाणी प्रशासन पॉझिटिव्ह अन् कोरोना निगेटिव्ह

Coronaa-mobile.jpg
Coronaa-mobile.jpg

धर्माबाद, (जि. नांदेड) : कोरोनावर मात करण्यात आतापर्यंत तरी धर्माबाद तालुका सरस राहिला आहे. धर्माबाद हा सीमावर्ती भाग असूनही आतापर्यंत पाठविलेले सर्व सात अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे धर्माबादची पाटी कोरीच आहे. पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. धर्माबादेतील प्रशासनाने आपला जीव धोक्यात घालून पॉझिटिव्ह राहून केलेले योग्य नियोजन आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळेच कोरोना निगेटिव्ह राहिला आहे.


कोरोना विषाणूने भारतात पाय पसरायला सुरवात करताच इकडे नांदेड जिल्ह्याच्या यंत्रणेसोबत धर्माबादची यंत्रणा सतर्क झाली होती. प्रशासनाने शहरी व ग्रामीण आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावून घेत प्रशिक्षण दिले. त्यांना मार्गदर्शन करून आधार दिला. त्यानंतर जर कोणी संशयित रुग्ण आलाच तर त्यांच्यासाठी सुरवातीला धर्माबादेतील माहेश्वरी भवनमध्ये स्वतंत्र १०० खाटांचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला. कोरोनाची गंभीरता लक्षात घेता या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांसह परिचारिका, कक्ष सेवकांची नियुक्तीही केली आहे. गेल्या महिन्यात तेलंगणात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. धर्माबाद हे महाराष्ट्र, तेलंगणा सीमेवर वसलेले आहे. तेलंगणातील निजामाबाद, म्हैसा, कंदाकुर्ती यासह तानूर या गावात कोरोना विषाणूची लागण झालेले नागरिक आढळल्याने धर्माबादकरांची झोपच उडाली होती. धर्माबादेत कोरोनाचा आता नक्कीच शिरकाव होणार, ही भीती प्रशासनासह धर्माबादकरांच्या मनात होती. परंतु, पोलिस प्रशासनाने मुख्य मार्गांची सीमाबंदी केली. बिद्राळी, बन्नाळी, बेल्लूर या सीमा बंदस्थानी चोवीस तास पोलिस विभाग तैनात आहेत.

शहरी पाठोपाठ ग्रामीण आरोग्य यंत्रणाही सतर्क आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही कोविड-१९ आजाराची लक्षणे दिसताच त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल केले जात आहे. करखेली येथे पाच खाटांचा आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. (ता. १७) मार्चपासून ते (ता. १६) मेपर्यंत बाहेर जिल्ह्यातून, विदेशातून आलेल्यांची नोंद घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्यांना आजार किंवा लक्षणे आहेत अशांची नोंद करून तपासणी व औषधोपचार केले. तसेच शहर व तालुक्यात दोन हजार ५७० लोकांना हातावर शिक्के मारून होम क्वारंटाइन केले, तर तेलंगणाचे १४, परभणीचे २२, नगरचा एक व नांदेड जिल्ह्यातील २४, असे एकूण ६१ लोकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन शहरातील माहेश्वरी भवनमध्ये करण्यात आले होते.

प्रशासनाने या सर्वांना वाहनांची व्यवस्था करून त्यांना स्वगृही पाठवण्यात आले. आतापर्यंत धर्माबादमध्ये कोरोनाचे सात संशयित रुग्ण दाखल केले होते. या सर्वांचे स्वॅब घेतले असता सर्वच निगेटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी दिली. धर्माबादमधून गेलेला एकही स्वॅब सुदैवाने पॉझिटिव्ह आलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत नशिबाने धर्माबादकरांची साथ दिल्याचे दिसत आहे.

धर्माबादेत प्रशासनातील ‘हम सात’
सुरवातीपासूनच उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दत्तात्रय शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इकबाल शेख, मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक खंदारे हे प्रशासनातील सात अधिकारी समन्वय अन् विचाराने काम करीत आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी शहर ते गाव पातळीपर्यंत यंत्रणेच्या बैठका घेऊन आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन करण्यातही अधिकारी कमी पडलेले नाहीत. त्यांना महसूल, शिक्षण, आरोग्य, पोलिस, पालिका, पंचायत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी पूर्णपणे सहकार्य केले आहे. त्यामुळेच धर्माबादची पाटी सद्यःस्थितीत कोरी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com