प्लाॅस्टिक वापरावर एक जुलैपासून बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Plastic Banned from 1July Collector Dr Vipin Meeting at Collectorate

प्लाॅस्टिक वापरावर एक जुलैपासून बंदी

नांदेड : एकल वापर प्लास्टिकच्या वापरातून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. यात विशेषत: सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व थर्माकॉल, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेट पाकिटावर आवरण म्हणून वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक काड्याच्या कान कोरणे, प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कॅन्डी, आईस्क्रीम कांड्या, प्लास्टिक प्लेटस, कप ग्लासेस व इतर साहित्यांचा समावेश आहे. या सर्व वस्तुंवर ता. एक जुलै २०२२ पासून बंदी घालण्यात आली असून याची विक्री होत असल्याचे निर्देशनास आल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी एकल प्लास्टिक वापराबाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. एकल वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या विविध वस्तू ऐवजी निसर्ग पुरक इतर अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने कापडी पिशव्या, बांबु, लाकडी वस्तु, सिरामिक्सचे प्लेट, वाट्या आदी चांगले पर्याय आहेत. नागरिकांनी अशा निर्सगपुरक वस्तुंचा वापर अधिकाधिक करावा, असे आवाहन डॉ. विपीन यांनी केले.

प्लास्टिकच्या वस्तू पासुन पर्यावरणाला अधिक धोका निर्माण होवू नये, या दृष्टीने यावर पुर्नप्रक्रिया करण्यावर अधिक भर द्यावा, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा नियोजन अधिकारी विकास आडे, महापालिका उपायुक्त निलेश सुकेवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. टेंभुर्णीकर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, क्षेत्रीय अधिकारी पंकज बावणे, महेश चावला तसेच गटविकास अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रूपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर पाच हजार रूपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा याचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास दहा हजार रूपये दंड आकारला जाईल. तिसऱ्यांदा कोणी धाडस केले तर त्यांच्याविरुद्ध २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्याचा कारावास असेल.

- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड

Web Title: Plastic Banned From 1july Collector Dr Vipin Meeting At Collectorate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top