VIDEO : एक जंतू... दिल्ली सोडली नाही... गल्ली सोडली नाही!

प्रमोद चौधरी
मंगळवार, 26 मे 2020

कोरोनाच्या अवस्थ वर्तमाचीच नोंद ‘चार हात लांबून...’ या कवितेतून घेतली आहे ती ख्यातकीर्त कवी प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी. या कवितेचे त्यांनी वाचन करून ती खास ‘ई-सकाळ’च्या वाचकांसाठी दिली.

नांदेड : कोरोना विषाणूने आज दिल्ली सोडली नाही अन् गल्लीही सोडली नाही. जळी, स्थळी, पाषाणी हा विषाणू पोचला आहे. त्याने अख्खं जग वेठीस धरलं. सगळीकडे कोरोनाचीच चर्चा आहे. मग यात साहित्यिक तरी लांब कसे राहतील? कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्या, बदलेलं जीवनमान याची नोंद साहित्यिक घेत आहेत. नक्कीच येणाऱ्या कैक पिढ्यांना ती संदर्भाचा परिणाम ठरणार आहे. या अवस्थ वर्तमाचीच अशीच नोंद ‘चार हात लांबून...’ या कवितेतून घेतली आहे ती ख्यातकीर्त कवी प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी. या कवितेचे त्यांनी वाचन करून ती खास ‘ई-सकाळ’च्या वाचकांसाठी दिली.

कोण आहेत केशव देशमुख? 
केशव सखाराम देशमुख हे एक मराठी लेखक आणि कवी आहेत. ते मराठी भाषा हा विषय घेऊन एमए, पीएच. डी. झाले आहेत. बीएच्या आणि एमएच्या अंतिम परीक्षांत ते मराठवाडा विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झाले होते. मेरतमध्ये आल्याबद्दल त्यांना विद्यापीठाची १४ पारितोषिके प्राप्त झाली होती. पीएच.डी. झाल्यावर ते नांदेड विद्यापीठात प्राध्यापक झाले आणि पुढे मराठी विभागाचे प्रमुख झाले. अथक (कवितासंग्रह), गाभा (कवितासंग्रह), चालणारे अनवाणी पाय (कवितासंग्रह), तंतोतंत (कवितासंग्रह), पाढा (कवितासंग्रह), पीकपाणी (संपादित), फ.मुं. शिंदे यांची काव्यप्रतिभा (फ.मुं शिंदे यांचे संक्षिप्त चरित्र, त्यांच्या कवितांची सूची आणि काही कवितांचे रसग्रहण), भाषाचिंतन (मराठीविषयक ४३ लेखांचा संग्रह), राजश्री शाहू यांची भाषणे (संपादित), साहित्य समाज आणि संस्कृती (संपादित)  आणि सौंदर्यशास्त्र (संपादित) आदी विपूल ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालेला आहे.

हेही वाचा - चायना टू मुखेड, व्हाया मुंबई - पुणे

त्यांची कोरोनावरील कविता अशी

चार हात लांबून...
एक जंतू
सगळं जग भयभीय करणारा
संशयाची भूतं भोवतालात नाचवणारा
चार हात लांब ठेवण्याचा
नवा अध्याय पैदा करणारा
असंख्य बंधनांचा उद्गाता
जीवनाची घडी बिघडून टाकणारा
तो मरेलच कधीतरी; हिंमत सोडलेली नाही आम्ही!

एक जंतू
‘हात धुवून’ मागं लागलेला साऱ्यांच्या
साबणाच्या फेसांतून पळून जाणारा
घबराट वाढवणारा सगळ्यांमध्ये
सावलीसारखा पाठलाग करत
माणसामागं फिरणारा; जरा पिसाळलेला!
गर्दीचा हात धरून आपलं घर गाठणारा

एक जंतू
बाजारांच्या वाटेवर पडून, दडून
पूलाच्या कठड्यांवर स्पर्शांची वाट पहाणारा
हात लागेल तिथं, इथं, कुठं कुठं! 
चपलांच्या तळाशी मातीत तोंड खुपसून
शंकांच्या मुळाशी रूखरूख वाढवणारा
बोटांच्या या आणि त्या अग्रांवर
आपण पुढंपुढं
तो मागंमागं
पुष्कळच लोचट, लागट, हलकटही बराचसा
नकळत हल्ला चढविणारा. चोर कुठला
यानं दिल्ली सोडली नाही, गल्ली सोडली नाही
सर्वठायी उजळमाथ्यानं रहाणारा...

येथे क्लिक कराच - अशोक चव्हाण मुंबईत दाखल, प्रकृती ठणठणीत...

एक जंतू
किंतू मनांत उत्पन्न करणारा
भावनांवर आरूढ झालेला
गणगोत, नाती, मित्र, सोबती, सहोदर,
कुटुंब, सोयरेधायरे, जवळचे नातलग
यांना लांबूनच नमस्काराचं
ट्युशन देणारा; माणसांत भयाचं बी रुजवणारा!

एक जंतू
मरेलच कधी तरी
‘अहो, मरण कुणाला चुकलं का?’
हे जंतुवा,
तुझ्याशी मैत्र आपुले
ना तू आता गनीम
तू साथी; तुझ्यासोबतच राहू. चालू. धावू. पळू.
पण, चारहात लांब भाऊ!
फार नखरे करायचे नाही...
फार जवळ यायचं नाही..
तुझा रस्ता वेगळा
माझा रस्ता वेगळा
जंतुवा, हे विसरायचं नाही
साथ साथ चल; और निकल

एक जंतू
महानगरांच्या वस्तीतून
या वस्तीत आस्ते आस्ते पोहचलेला
ओळखपाळख न दाखवता
लगट करत चिकटणारा
श्वासांवर नजर ठेवत 
देहांत घर करणारा
अस्वच्छतेची बाजू उचलून धरणारा
माणसं घायाळ करणारा
देश-प्रदेश सोडायला लावणारा
जीवांच्या प्राणांवर आघात करणारा
मेंदुतली लिपी विचलीत करणारा
दगाबाज. धूर्त. चिटकू लेकाचा...

या एका जंतुवाला
आम्ही मूळीच घाबरणार नाही
त्याला सोबत घेऊन लढत राहू
‘सुरक्षा 
सावधान
स्वच्छता’
यांचं विस्मरण होऊ न देता
आम्हीच जिंकू;
ही काळ्या दगडावरची रेघ आहे!

एक जंतू
असे अनेक जंतू
येतील आणि जातील;
माती अमर असते भाऊ!
माणूस अमर असतो भाऊ!
काळ अंतिम असतो भाऊ!
वर्तमान बदलत असतो भाऊ!
आणि
असते
वेदनापण
अमर!
जंतुवा,
तुझ्या छळण्याचा काळ आहे लिमीटेड
जगाला धरू शकतोस तू वेठीला
मात्र राज्य नाही करू शकत
जगांवर;
एवढं विसरू नकोस! 
- प्रा. डाॅ. केशव सखाराम देशमुख, नांदेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poem by Keshav Deshmukh On Corona Nanded News