esakal | पोलिसांची मोठी कारवाई : स्वस्त धान्याचा 30 टन तांदूळ जप्त- एपीआय शिवप्रकाश मुळे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

उस्माननगर पोलिसांनी धाडशी कारवाई करुन काळ्या बाजारात जाणारा स्वस्त धान्याचा जवळपास तीस टन तांदूळ जप्त केला. ही कारवाई सोमवारी (ता. १२) सायंकाळी पाचच्या सुमारास मारतळा परिसरात केली. पोलिसांनी ट्र्क, तांदूळ जप्त करुन चालकास ताब्यात घेतले आहे.

पोलिसांची मोठी कारवाई : स्वस्त धान्याचा 30 टन तांदूळ जप्त- एपीआय शिवप्रकाश मुळे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना मिळणारा तांदूळ व गहू या धान्यांचा मागील काही दिवसापासून सतत काळाबाजार होत असल्याचे उघडकीस येत आहे. कृष्णूर (ता. नायगाव) आणि मुक्रमाबाद (ता. मुखेड) येथील धान्य घोटाळा ताजा असतानाच पुन्हा एकदा उस्माननगर पोलिसांनी धाडशी कारवाई करुन काळ्या बाजारात जाणारा स्वस्त धान्याचा जवळपास तीस टन तांदूळ जप्त केला. ही कारवाई सोमवारी (ता. १२) सायंकाळी पाचच्या सुमारास मारतळा परिसरात केली. पोलिसांनी ट्र्क, तांदूळ जप्त करुन चालकास ताब्यात घेतले आहे.

तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील एका कंपनीमधून शासकिय वितरणचा तांदूळ व गहु पकडला होता. या प्रकरणातील आरोपी असलेले नुकतेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने अटी व शर्थीवर जामीन दिला होता. यातील आरोपी असलेला तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर हा अद्याप फरार आहे. या प्रकरणानंतर धाण्याचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. हे प्रकरण सध्या राज्य गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) तपासासाठी देण्यात आलेले आहे.

हेही वाचाचुलत आजोबाने केला सात वर्षीय नातवाचा खून, गळा दाबल्यानंतर विळ्याने वार 

मुक्रमाबाद धाण्य घोटाळा सुरुच

हे प्रकरण सुरु असतानाच पुन्हा मागील काळात मुक्रमाबाद (ता. मुखेड) येथे स्वस्त धाण्याच्या काळाबाजार पुढे आला. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यातील काहीजण अटक झाले. जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी यात लक्षघालून धान्य पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावरही कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. नायब तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या घोटाळ्यातही मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे. जिल्हािकाऱ्यांच्या अहवालाची प्रतिक्षा असून लवकरच यात योग्य ते निर्णय येईल असे सांगण्यात येत आहे. 

उस्माननगर पोलिसांची मोठी कारवाई 

हे दोन घोटाळे उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश मुळे आणि काळ्याबाजारात जाणारा तब्बल 30 टन तांदूळ मारतळा परिसरातून जप्त केला आहे. या कारवाईमुळे धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की वसमत येथून अंदाजे 30 टन तांदूळ भरुन पेद्दापुरम जिल्हा राजमंड्री (आंध्र प्रदेश) येथे हे घेऊन जात असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश मुळे यांना त्यांच्या गुप्त माहितीदाराकडून प्राप्त झाली. यावरुन श्री मुळे यांनी सोमवारी ता. 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उस्माननगर हद्दीत नांदेड ते देगलूर रस्त्यावर मारतळा परिसरात आपले सहकारी सहाय्यक फौजदार श्री. बेग, हवालदार श्री. मगदूम आणि श्री. मोरे यांना घेऊन सापळा लावला. यावेळी ट्रक क्रमांक (टीएस16- युबी 59 87) घेऊन चालक अमोल किशोर जगताप, राहणार गोकुंदा तालुका किनवट हा भरधाव वेगात येत असल्याचे दिसले. त्याला थांबवायचा प्रयत्न केला. मात्र पोलीस दिसताच ट्रकचालकाने नायगावकडे आपला ट्रक भरधाव वेगाने पळविला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग करुन श्री मुळे यांनी हा ट्रक मारतळा परिसरात अडविला.

येथे क्लिक करा - नांदेड-मुंबई विशेष रेल्वेने ३६९ प्रवासी रवाना, पहिल्याच दिवशी शंभर टक्के प्रतिसाद

पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले कौतुक 

चालकास ताब्यात घेऊन ट्रकमधील मालाची माहिती विचारली. यावेळी ट्रक चालक अमोल जगताप याची बोबडी वळली. त्या ट्रकमध्ये वसमत येथून शासकीय वितरणाचा 30 टन तांदूळ काळ्याबाजारात जात असल्याची माहिती मिळाली. ट्रक मालकाचे नाव विचारले असता दलजीतसिंग उर्फ पिंटूसिंग भट्ट असे असल्याचे चालक अमोल जगताप यांनी पोलिसांना सांगितले. तांदूळ शासकीय धान्य वितरण प्रणालीमधील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून सदरचा ट्रक उस्माननगर पोलिस ठाण्यात लावण्यात आला आहे. या धाण्याबद्दल तपासणी व्हावी यासाठी तालुका पुरवठा निरीक्षक लोहा यांना अभिप्राय पाठवून देण्यात आला. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येत येईल असे श्री मुळे यांनी सांगितले आहे. उस्माननगर पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर शिवप्रकाश मुळे यांनी या भागातील अनेक अवैध धंदे बंद करण्याचा प्रयत्न केला. कृष्णूर येथील धान्य घोटाळा उघडकीस आणण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ते त्या वेळी पोलिस अधीक्षक श्री. मीना यांच्या विशेष पथकाचे प्रमुख होते. सोमवारी झालेल्या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी श्री मुळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे