पोलिसांचे शहरात धाडसत्र सुरूच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police raids continue in the city to reduce crime nanded

पोलिसांचे शहरात धाडसत्र सुरूच...

नांदेड : पोलिस विभागाच्या वतीने रात्री बेरात्री फिरणाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. तसेच जुगार अड्यावर आणि बेकायदा अवैध दारू विक्री करणाऱ्यावर छापा टाकून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या २४ तासात तलवार, खंजर बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर तीन ठिकाणी छापे जुगार खेळणाऱ्यांकडून जुगाराचे साहित्य आणि नऊ हजार दोनशे रुपये जप्त केले आहेत. तसेच दोन ठिकाणी छापे टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडील साडेतीन हजाराची दारू जप्त करण्यात आली आहे.

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलिस विभागाच्या वतीने विविध पोलिस ठाण्यातंर्गत नाकाबंदी, गस्त सुरू असून पोलिस पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. शहरातील लेबर कॉलनी भागात तलवार बाळगणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत विष्णुनगर भागात खंजर बाळगणाऱ्यास अटक करण्यात आली असून या दोघांविरूद्ध शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वजिराबाद भागात साजणे हॉस्पीटलजवळ जुगार खेळणाऱ्यांना तिघांना पकडून त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य आणि रोख पाच हजार ५१० रुपये जप्त करण्यात आले आहेत. याबाबत वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाजेगाव येथील ओमनगरात आश्रमाच्या भिंतीलगत सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्याच्याकडील जुगाराचे साहित्य आणि रोख दोन हजार ४५० रुपये जप्त करण्यात आले आहेत. याबाबत नांदेड ग्रामिण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनवट शहरात सरदारनगरला मोकळ्या मैदानात जुगार खेळणाऱ्यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडील साहित्य आणि रोख एक हजार २४० रुपये जप्त करण्यात आले आहेत. नरसी ते मुखेड रस्त्यावर वाघोबाची खारी येथे शटरमध्ये अवैध देशी दारू बाळगणाऱ्यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडील दीड हजाराची देशी दारू जप्त करण्यात आली आहे.

याबाबत मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत बळेगाव (ता. देगलूर) येथे अवैधरित्या गावठी दारू विकणाऱ्यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडील दोन हजाराची दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत देगलूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय बियाणींचे मारेकरी सापडेनात

दरम्यान, बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या होऊन जवळपास २२ दिवस उलटले असले तरी अजूनही पोलिसांना बियाणीचे मारेकरी सापडले नाहीत. या घटनेचा तपास एसआयटी मार्फत करण्यात येत आहे. त्याचबरोबर नांदेड पोलिस विभागाने विविध ठिकाणी पोलिस पथक पाठवले असले तरी अद्याप पोलिसांना मारेकऱ्यांपर्यंत पोहचता आले नाही. या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यास पोलिस विभाग व्यस्त असून आत्तापर्यंत अनेक गुन्हेगारांना आणून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. परंतु मारेकऱ्यांचा शोध लागला नाही.

Web Title: Police Raids Continue In The City To Reduce Crime Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top