नांदेड जिल्ह्यातील गाव कारभाऱ्यांचे भवितव्य मतपेटीत बंद; सोमवारी फैसला

अभय कुळकजाईकर
Friday, 15 January 2021

नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १५) ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६९.९२ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान संपले असून सरासरी ८० ते ८२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

नांदेड - जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) झालेल्या मतदानात अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर रांगा लाऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गाव कारभाऱ्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून आता सोमवारी (ता. १८) मतमोजणी होणार असून कोण निवडून येणार?, याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६९.९२ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान संपले असून सरासरी ८० ते ८२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. 
 
कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यात पहिल्यांदाच ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता जिल्ह्यातील दोन हजार ९१३ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार असून त्यासाठी सुमारे ११ हजार ४१२ शासकीय कर्मचारी व निवडणूक अधिकारी जबाबदारी पार पाडली आहे. निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपजिल्हाधिकारी शरद मंडलीक यांच्यासह उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, कर्मचाऱ्यांनी तसेच पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. 

हेही वाचा -  माहूरला दुचाकीला धडक देऊन पळ काढणारा ट्रक जमावाने पेटावला

स्थानिक पातळींवर आघाड्या 
ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षातर्फे अधिकृत चिन्हावर निवडणुक लढवता येत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर गावागावांमध्ये विविध आघाड्या स्थापन झाल्या होत्या. त्यात पॅनलप्रमुखांसह उमेदवारांचा समावेश होता. काही ठिकाणी पक्षीय मतभेद बाजूला सारून स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या आघाड्या झाल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे त्या ठिकाणी प्रचारही जोरात झाला होता. कोरोना संसर्गातील ही पहिलीच निवडणुक असल्यामुळे त्याचा निकाल काय लागणार? याचीही उत्सुकता मतदारांमध्ये आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - पेट्रोलच्या दरामध्ये मध्येही...भारतात परभणी...! 

थोडक्यात संक्षिप्त आकडेवारी 

 • एकूण ग्रामपंचायती - एक हजार ३०९ 
 • निवडणुक असलेल्या ग्रामपंचायती - एक हजार १३ 
 • बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती - १०६ 
 • निवडणुक झालेल्या ग्रामपंचायती - ९०७ 
 • निवडणुक झालेल्या प्रभागांची संख्या - दोन हजार ८२८ 
 • मतदान झालेल्या जागांची संख्या - सहा हजार ८६२ 
 • मतदान केंद्राची संख्या - दोन हजार ९१३ 

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा - 
 
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी 

तालुक्याचे नाव - दुपारी साडेतीनपर्यंत 

 1. नांदेड - ६९.०९ टक्के 
 2. अर्धापूर - ७३.४२ टक्के 
 3. भोकर - ७४.२४ टक्के 
 4. मुदखेड - ७०.१८ टक्के 
 5. हदगाव - ६८.११ टक्के 
 6. हिमायतनगर - ६५.४१ टक्के 
 7. किनवट - ७१.९८ टक्के 
 8. माहूर - ७३.१७ टक्के 
 9. धर्माबाद - ७४.०५ टक्के 
 10. उमरी - ७४.८३ टक्के 
 11. बिलोली - ७२.३२ टक्के 
 12. नायगाव - ६९.८८ टक्के 
 13. देगलूर - ७३.३६ टक्के 
 14. मुखेड - ६९.२४ टक्के 
 15. कंधार - ६७.७२ टक्के 
 16. लोहा - ६४.८७ टक्के 
 17. एकूण - ६९.९२ टक्के

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Polling of Gram Panchayat candidates in Nanded district closed in ballot boxes, counting of votes on Monday nanded election news