पॉझिटिव्ह न्यूज - सहा महिन्याच्या चिमुकलीने कोरोनाला हरवले...

अभय कुळकजाईकर
मंगळवार, 2 जून 2020

सहा महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची बाधा झाल्यानंतर तिला बरे करण्याचे आव्हान डॉक्टरांच्या टीमसमोर होते. गंभीर संसर्ग असल्याने तिच्यावर डॉक्टरांच्या टीमने त्वरीत योग्य तो उपचार केला. त्यामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि तिचा अहवाल मंगळवारी (ता. दोन) निगेटिव्ह आला त्यामुळे तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

नांदेड - सहा महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची बाधा झाल्यानंतर तिला बरे करण्याचे आव्हान डॉक्टरांच्या टीमसमोर होते. सुरवातीला उपचाराला प्रतिसाद देणाऱ्या चिमुकलीची प्रकृती गंभीर संसर्गामुळे खालावली. तरी देखील डॉक्टरांच्या टीमने तिच्यावर तब्बल दहा दिवस अथक परिश्रम घेत तिची कोरोनाच्या तावडीतून सुटका केली. चिमुकलीने देखील उपचाराला प्रतिसाद देत कोरोनावर मात केली. 

जुन्या नांदेडमधील करबला येथील सहा महिन्याच्या मुलीला कोरोना झाल्याने ता. २४ मे रोजी तिला पंजाब भवन येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, नंतर प्रकृती खालावल्यामुळे विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. गंभीर संसर्ग असल्याने तिच्यावर डॉक्टरांच्या टीमने त्वरीत योग्य तो उपचार केला. त्यामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि तिचा अहवाल मंगळवारी (ता. दोन) निगेटिव्ह आला त्यामुळे तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

हेही वाचा - Video - नागरिकांनो जीवाची पर्वा करणार केव्हा?

जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केले कौतुक
जिल्हाधिकारी डॉ. विपीन, आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, नोडल आफिसर डॉ. संजय मोरे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी कोरोना बाधित झालेल्या मुलीच्या आईची जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सहानुभुतीपूर्वक विचारपूस केली. यावेळी चांगले उपचार झाल्याबद्दल मुलीच्या आईनेही समाधान व्यक्त केले. मुलीवर बालरोगशास्त्र विभागातील विभागप्रमुख डॉ. सलीम तांबे, डॉ. किशोर राठोड, डॉ. अरविंद चव्हाण, डॉ. सरफराज अहेमद, डॉ. नागेश लोणीकर, डॉ. बंटेवाड, डॉ. समीर व डॉ. सुप्रिया यांनी उपचार केले. जिल्हाधिकारी, आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी डॉक्टरांच्या टीमचे कौतुक करुन अभिनंदन केले.

आतापर्यंत १२१ रुग्ण बरे
जिल्ह्यात मंगळवारी (ता. दोन) सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालेल्या ६७ अहवालापैकी ६० निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन तीन रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या आता १५२ झाली आहे. या तीन रुग्णांपैकी सात वर्षांची मुलगी, चार वर्षाचा मुलगा हे रुग्ण नांदेडच्या लोहार गल्ली येथील तर ५५ वर्षे वयाचा एक पुरुष रुग्ण कुंभारटेकडी सराफा बाजार येथील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात २३ रुग्णांवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. त्यातील तीन रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात ५२ व ६५ वर्षांच्या दोन स्त्री रुग्ण तर ३८ वर्षाचा एक पुरुष रुग्ण आहे. आतापर्यंत एकूण १५२ रुग्णांपैकी आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून १२१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

हेही वाचलेच पाहिजे - Video : उपयुक्त पावसानंतरच करावी खरीप पेरणी....कोण म्हणाले ते वाचा

२३ रुग्णांवर उपचार सुरु
उर्वरित २३ रुग्णांपैकी विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आठ रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे बारा रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दोन रुग्ण, मुंबई येथे संदर्भित करण्यात आलेला एक रुग्ण आहे. उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. ता. एक जून रोजी प्रलंबित असलेल्या १७६ स्वॅब तपासणी अहवालापैकी ६७ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित १०९ अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. ता. दोन जून रोजी १५८ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल बुधवारी (ता. तीन) सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.

कोरोनाविषयी संक्षिप्त माहिती

  • सर्वेक्षण - एक लाख ४० हजार ९२२
  • घेतलेले स्वॅब - चार हजार १५३
  • निगेटिव्ह स्वॅब - तीन हजार ५४६
  • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - १५२
  • स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - १५५
  • स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - २८
  • मृत्यू संख्या - आठ
  • रुग्णालयातून सुटी दिलेली संख्या - १२१
  • रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - २३
  • स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या - २६७

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Positive News - Six-month-old Child loses Corona ..., Nanded news