Video: रस्त्यांचा होता अडथळा, मग प्रसूतीसाठी बैलगाडीच आली साथीला...

स्मिता कानिंदे
गुरुवार, 28 मे 2020


कोलाम आदिम जमातीची वस्ती असणाऱ्या शिवशक्तीनगर (घोगरवाडी) येथील दोन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था आहे. तेथे रस्ता नसल्याने गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी बैलगाडीने न्यावे लागते. येथील सुनीता दशरथ मडावी या आदिवासी गर्भवती महिलेस मंगळवारी (ता. २६) सकाळी बैलगाडीतून दवाखान्यात नेण्यात आले.

गोकुंदा, (ता.किनवट, जि. नांदेड) ः तालुका मुख्यालयापासून दहा किलोमीटरच्या आत असणाऱ्या वनातील आदिवासींमधील कोलाम आदिम जमातीची वस्ती असणाऱ्या शिवशक्तीनगर (घोगरवाडी) येथील दोन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था आहे. तेथे रस्ता नसल्याने गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी बैलगाडीने न्यावे लागते. येथील सुनीता दशरथ मडावी या आदिवासी गर्भवती महिलेस मंगळवारी (ता. २६) सकाळी बैलगाडीतून दवाखान्यात नेण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन मुंडे, दत्ता आडे, आरोग्य विभागाचे अमृत तिरमनवार यांनी महिलेस दवाखान्यास नेण्यासाठी सहकार्य केले.

अत्यंत खराब अवस्थेतील दोन किलोमीटर रस्ता पार केल्यानंतर चांगला रस्ता येतो. तिथपर्यंत रुग्णवाहिकेचे आगमन होते. अशा प्रसंगी प्रसववेदनेने गर्भवती महिलांना प्राणालाही मुकावे लागते. यापूर्वी (ता. २३) ऑक्टोबर २०१६ रोजी अशीच एक घटना या आदिवासी गावात घडली होती. अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी मागणी होत असताना या रस्त्यासाठी वनविभाग, जिल्हा परिषद, आदिवासी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातून भरघोस निधी प्राप्त झाला. परंतु, आजपर्यंत तेथे रस्ताच तयार झाला नाही. 

हेही वाचा - ​ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांचा राजकीय सेवानिवृत्तीचा निर्णय !

लॉकडाउनमुळे या रस्त्याचे काम थांबले
हा आलेला निधी कुठे गेला, या गंभीर रस्ता प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी तेथील नागरिकांची मागणी आहे. अशाच प्रकारे तालुक्यातील पितांबरवाडी (भीमपूर), वाघदरी, भुजंगनगर, पिंपळशेंडा, वरगुडा, दत्तनगर (अपारावपेठ) या वस्तींची स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्याअभावी दुर्दशा कायम आहे. या रस्त्यासाठी आलेला निधी टीएसपी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असून कोरोना परिस्थिती व लॉकडाउनमुळे या रस्त्याचे काम थांबले असून लवकरच या कामाला सुरवात होणार असल्याचे या वेळी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Pregnant Woman Was Taken To The Hospital By A Bullock Cart, Nanded News