esakal | ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांचा राजकीय सेवानिवृत्तीचा निर्णय !
sakal

बोलून बातमी शोधा

nanded news

श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी अचानक असा निर्णय घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. अनेकांनी खातरजमा केली तसेच श्रीमती पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही. नांदेडसह संपूर्ण राज्यभरात त्याचे गुरूवारी (ता. २८) पडसाद उमटले. अनेकांनी त्यावर चर्चा केली.

ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांचा राजकीय सेवानिवृत्तीचा निर्णय !

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर
 

नांदेड  : कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप असा राजकीय प्रवास केलेल्या ज्येष्ठ नेत्या माजी केंद्रीय ग्रामविकास तथा संसदीय कार्य राज्यमंत्री श्रीमती सुर्यकांता पाटील यांनी बुधवारी (ता. २७) रात्री उशीरा राजकीय सेवानिवृत्ती घेत असल्याचे फेसबुकवरुन सांगितले. आता आपण यापुढे नवीन पिढीतील नेतृत्व घडविण्यासाठी मार्गदर्शन करू, असेही त्यांनी त्यात म्हटले आहे.

श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी अचानक असा निर्णय घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. अनेकांनी खातरजमा केली तसेच श्रीमती पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही. नांदेडसह संपूर्ण राज्यभरात त्याचे गुरूवारी (ता. २८) पडसाद उमटले. अनेकांनी त्यावर चर्चा केली.

हेही वाचा - अशोक चव्हाण उपचारासाठी मुंबईला का गेले...

पाटील घराण्याचा राजकीय वारसा
श्रीमती सूर्यकांता पाटील यांचे मूळ गाव वायफना (ता. हदगाव, जि. नांदेड) असून वडील स्वातंत्र्यसैनिक जयवंतराव पाटील तर आई अंजनाबाई पाटील. पाटील घराण्याचे हदगाववर वर्चस्व राहिले आहे. पहिल्या निवडणुकीत सूर्यकांता पाटील यांचे काका माधवराव पाटील वायफनेकर यांनी त्यावेळी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांचा पराभव केला होता. त्याचबरोबर त्यांच्या आई अंजनाबाई या जिल्ह्यातील पहिल्या आमदार महिला झाल्या होत्या. १९५७ मध्ये त्यांनी बलाढ्य अशा श्‍यामराव बोधनकर यांना पराभूत केले होते. त्यानंतर बोधनकरांनी राजकीय संन्यास घेतला होता.

सूर्यकांताबाई यांचीही यशस्वी कारकीर्द
सूर्यकांता पाटील या सुरवातीला नांदेडमधून नगरसेवक झाल्या. त्यानंतर त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या. त्यानंतर १९८० मध्ये त्या कॉँग्रेसकडून हदगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. त्यांनी बापूराव शिंदे यांचा पराभव केला. त्यावेळी पाटील यांना ३४ हजार ७१३ मते पडली होती. सूर्यकांताबाई यांना खासदारकीची निवडणुक १९९१ मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून कॉँग्रेसतर्फे लढवली आणि त्या दोन लाख ५१ हजार २१ मते घेऊन खासदार झाल्या. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे डॉ. डी. आर. देशमुख आणि डॉ. व्यंकटेश काब्दे यांचा पराभव केला होता.

केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवले
श्रीमती सुर्यकांता पाटील या खूप काळ काँग्रेस पक्षात होत्या. राजीव गांधी, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांसोबत त्या कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षासोबत आणि शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून त्या राष्ट्रवादीकडून दोनदा निवडून आल्या. युपीए - दोन मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास तथा संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.

हे देखील वाचाच - जेंव्हा हरवलेली बायको सापडते पलंगाखाली...

२००९ मध्ये त्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या. शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी त्यांना पराभूत केले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत त्या इच्छुक होत्या पण त्यावेळी हिंगोली मतदारसंघ हा कॉँग्रेसला देण्यात आला आणि त्या ठिकाणी कॉँग्रेसचे राजीव सातव खासदार झाले. त्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानपरिषदेवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांचे नावही निच्शित होते मात्र, त्यावेळी त्यांचे नाव वगळून रामराव वडकुते यांना सदस्य करण्यात आले. त्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या. पुढे त्यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत हिंगोलीसाठी त्यांचे नाव चर्चेत आले पण ही जागा शिवसेनेला सुटली त्यामुळे त्यांचे नाव पुन्हा मागे पडले. तरी देखील त्या भाजपमध्ये होत्या.

हे ही वाचलेच पाहिजे - लॉकडाउनमध्ये फासली नात्यांना काळीमा, घरातच... ​

काय म्हणाल्या सूर्यकांताबाई पाटील...
बुधवारी (ता. २७) रात्री फेसबुकवर त्यांनी टाकलेली पोस्ट अशी आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क केला पण त्यांनी बोलण्याचे टाळले....
आता थांबावे असे वाटत नाही । ना किसींसे दोस्ती, ना किसींसे बैर
खूप प्रेम मिळाले... जळणारे होते पण प्रेम करणाऱ्यांची संख्या अधिक होती. मला ते सर्व मिळाले जे एक सामाजीक जीवनात असणाऱ्या व्यक्तीला मिळायला हवे. ४३ वर्ष राजकारणात होते. एखाद्या राजकुमारीसारखी राहिले. चारशे रुपयांची साडी चार हजाराच्या थाटात नेसली. मिळालेले काम मन लावून केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अशा अनोख्या प्रांतात माझ्यासारखी मनस्वी रमू शकत नाही.


राजीनामा लिहून तयार होता पण मी आहेच कोण म्हणून एवढा शो करायचा. सगळ्यांनीच प्रेम दिले, सन्मान दिला काहीच तक्रार नाही. आपलीच लायकी नाही, हे समजले होते. रागात घेतलेले निर्णय असेच असतात. ते योग्य की अयोग्य? हे सारासार बुद्धीला जेव्हा ठरविता येते. नाही तिथे तोंडाला नवा रंग लावून विचार बदलत नाहीत. हे पक्के समजलंय. त्यामुळे धाकटे लोक राजकारण सोडतो, म्हणत असताना मला आता काय मिळवायचे आहे. एकटीने सगळे जिंकले. लोकांना कंटाळा येईपर्यंत प्रवास करायची माझी तयारी नाही. ज्यांच्यासाठी काम केले त्यांनी सन्मानही केला आणि आज जे नाहीच आहेत. त्यांच्या आठवणी मनात आहेत.

येथे क्लीक कराच - Video- काय करावं काही सुचत नाही...श्रमाची साधना पुढे न्यायची असते

आपण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो, याची खंत आहे. पण माझा निस्वार्थ प्रवास मला फार समृद्ध करून गेला. जेव्हा लिहायचे तेव्हा लिहिलं पण आज मी माझा राजकीय प्रवास थांबवीत आहे. या पुढे नव्या पिढीसाठी काम करील. घरी बसणार नाही. बसून कुरवळण्याएवढे काही नाही माझ्याजवळ. विचारांची शिदोरी घेऊन आज मी माझे राजकारण थांबवीत आहे. सगळ्या सहप्रवासी सहकाऱ्यांचे हार्दिक आभार. मी आहे कधीही... या घर आणि मी तुमचीच आहे. नमस्कार सगळ्यांना.. थांबते...

 

ReplyForward