शेतमालाच्या दरात घसरण झाली....असा घ्या फायदा 

कृष्णा जोमेगावकर
शुक्रवार, 29 मे 2020

शेतमाल तारणकर्ज योजना राज्यात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ अंतर्गत सर्व जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत राबविली जात आहे. यात शेतकऱ्यांना शेतीमालावर तारणकर्ज वार्षिक सहा टक्के व्याजदराने सहा महिण्याच्या कालावधीसाठी देण्यात येते. 

 नांदेड : शेतमाल तारणकर्ज योजनेमध्ये शेतकऱ्यांना बाजारात दर पडल्यानंतर नुकसान टाळण्यासाठी शेतमाल जवळील बाजार समितीच्या गोदाममध्ये किंवा वखार महामंडळ यांच्या गोदाममध्ये ठेवून शेतीमालाच्या चालू बाजारभाव किंवा हमीभाव किंमतीच्या ७५ टक्के रक्कम तारणकर्ज म्हणून घेता येइल. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी केले आहे. 

शेतमालाचे दर घसरले तेव्हा होतो फायदा
शेतमाल तारणकर्ज योजना राज्यात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ अंतर्गत सर्व जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत राबविली जात आहे. यात शेतकऱ्यांना शेतीमालावर तारणकर्ज वार्षिक सहा टक्के व्याजदराने सहा महिण्याच्या कालावधीसाठी देण्यात येते. ज्या वेळी बाजारात शेतीमालाचे भाव घसरतात, अशा वेळी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. ज्या वेळी बाजारात शेतीमालाचे भाव आपल्याला योग्य वाटतील तेव्हा तारणकर्ज रक्कम भरून शेतीमाल विकता येतो. शेतीमाल तारण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या  बाजार समितीशी संपर्क करावा, असे आवाहन श्री फडणीस यांनी केले आहे. 

हेही वाचा.....जी. आर. चिंतालामुळे कृषी व ग्रामिण विकासाला बळकटी मिळेल......कशी ते वाचा

शेतमाल तारण योजनेची वैशिष्ट्ये
योजनेतील पिके 
- मूग, उडीद, सोयाबीन, धान (भात) तूर, सूर्यफूल, करडी, ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा (चना) हळद, बेदाणा, काजू बी इ.
- शेतमालाच्या चालू बाजारभाव किंवा हमीभावाच्या ७५ टक्के तारण कर्ज
- कर्जाचा व्याजदर केवळ सहा टक्के 
- तारण कालावधी सहा महिने (१८० दिवस)
- गोदाम भाडे व इतर खर्च बाजार समिती करणार (बाजार समिती गोदाम मधील)
- वखार पावतीवरही तारण कर्ज उपलब्ध

हेही वाचलेच पाहिजे.....अवैध दारू विक्रीचा सपाटा सुरुच.....कुठे ते वाचा

दोन कोटी २० लाख तारण कर्ज वाटप 
जिल्ह्यात शेतमाल तारण योजना राबविण्यात येत असलेल्या बाजार समिती सन २०१९ - २०२० याठी धर्माबाद बाजार समिती १४२, नांदेड १०, हदगाव तीन, किनवट चार अशा एकूण १६२ शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. शेतमाल तारणकर्ज योजनेत दोन कोटी २० लाख ७५ हजार ३४१ रुपये तारणकर्जाचे वाटप करण्यात आले आहे. शेतमाल तारणकर्ज योजना ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांने नुकसान टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व बाजार समिती सचिवांना आदेश
जिल्ह्यात शेतमाल तारण योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व बाजार समिती सचिवांना आदेश दिले आहेत. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
- प्रविण फडणीस,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) नांदेड.

तारणकर्ज योजनेसाठी परिपत्रक दिले 
जिल्ह्यातील सर्व बाजार समिती सचिवांना शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यासाठी मुख्यालय व विभागीय कार्यालयामार्फत परिपत्रक दिले आहे. बाजार समिती सचिवांनी आपल्या स्तरावर योजनेचा प्रचार करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
- पृथ्वीराज मनके
कृषि व्यवसाय पणन तज्ज्ञ, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The prices of agricultural commodities have come down