नांदेडला ‘अक्षर परिवारातील’ शिक्षकांचा गौरव, कसा? ते वाचाच

प्रमोद चौधरी
Saturday, 5 September 2020

कोरोना महामारीमुळे देश लॉकडाउन केला. परिणामी, शाळा-महाविद्यालये मार्चपासून बंदच आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून आॅनलाईन शिक्षण सध्या सुरु आहे. मात्र, ग्रामीण विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित रहात आहे.

नांदेड : शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण विद्यार्थीही शिक्षणापासून दूर जावू नये, यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजवण्याचे काम अक्षर परिवारातील शिक्षक एका चातक पक्षाप्रमाणे करत आहे. त्यामुळे हे शिक्षकच ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधारवड ठरत आहे.

ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कुठलीच व्यवस्था नाही, अशा विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यासाठी वाजेगाव शैक्षणिक बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी ‘अक्षर परिवार’ हा उपक्रम सुरु केला आहे. सर्व शिक्षकांचा यामध्ये सहभाग असून, ते लॉकडाउन लागल्यापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजविण्याचे काम अविरत करत आहेत.

हेही वाचाच - जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले, हेच माझे खरे शिक्षक
 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शनिवारी (ता.पाच सप्टेंबर) देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा होत आहे. कोरोना काळात शिक्षणाच्या वाटा शोधत अक्षर परिवारातील सर्व अक्षर यात्री तन-मन-धनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम करत आहेत. त्यांना पाठबळ मिळावे, त्यांच्या कामाची दखल घ्यावी म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्ताने ‘वाजेगाव शिक्षक भूषण पुरस्कार’ देण्याची संकल्पना श्री. चौधरी यांनी सर्व शिक्षकांसमोर मांडली होती.  

हे देखील वाचा - पुस्तकांचा खजिना अन् शिक्षकांच्या प्रेरणेने घडलो - आयुक्त डॉ. सुनील लहाने 

श्री. ढोके यांना पुरस्कार
ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे कार्य अविरत करणाऱ्या शिक्षकांचे मनोबल वाढविण्यासाठी एका शिक्षकाचा सन्मान शिक्षक दिनानिमित्त होत आहे. वाजेगाव शिक्षण विभागाचा शिक्षकभूषण पुरस्कार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूर येथील शिक्षक अक्षय ढोके यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार समितीतील पदोन्नत मुख्याध्यापक बालाजी गाढे, सटवाजी माचनवार, तुकाराम जाधव, दत्तप्रसाद पांडागळे, तुकाराम रेनकुंठवार यांच्या समितीने ही निवड केली.

येथे क्लिक कराच - Video- शिक्षक दिन विशेष : निवृत्त शिक्षकाचा असाही छंद

शाळा बंद, शिक्षण चालू
केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शिक्षक ‘शाळा बंद शिक्षण चालू’ हा उपक्रम तंत्रस्नेही शिक्षकांच्या माध्यमातून विविध  लिंकचा वापर करून व व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वर्गनिहाय गट पाडून अभ्यास व सराव करून घेत आहेत. कोरोना काळातील  योगदान भविष्यात नोंद घेण्यासारखी आहे व आपल्या कार्याची आठवण तुमच्या समोर बसलेल्या कोमल मुलांना जीवनभर स्मरणात राहणारी आहे. विभागातील सर्व शिक्षकांनी आपल्या कुटुंबाला सांभाळत आपली काळजी घेत, कोरोना काळात मोबाईलच्या माध्यमातून तसेच ज्या ठिकाणी सुविधा नाही अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या दारी जाऊन, वस्तीवर जाऊन शिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pride Of Teachers In Akshar Parivar Nanded News