मुर्खाच्या नंदनवनात उधळलेले गाढव म्हणजे गोपीचंद पडळकर! कोण म्हणाले वाचा...

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध

नांदेड - दलित, शोषीत, वंचित, अल्पसंख्यांक, महिला तसेच सर्वच समाज घटकाला सन्मानाने जगता यावे, यासाठी अवघे आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी घालविले. अशा महान पुरोगामी नेतृत्वाबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जी गरळ ओकली ती अशोभनीय असून मुर्खाच्या नंदनवनात उधळलेले गाढव म्हणजे पडळकर आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी भावना व्यक्त करून पडळकर यांचा निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. २५) पक्षाच्या कार्यालयात डॉक्टर लेन कदम हॉस्पीटल येथे निषेध बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सुनील कदम बोलत होते. 

पडळकरांनी क्षमतेपेक्षा अधिक बोलू नये
आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक बोलू नये असे सांगून डॉ. कदम म्हणाले की, शरद पवार यांनी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम केले आहे. पडळकरांनी केलेले वक्तव्य बिनबुडाचे असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही. पडळकरांनी माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी त्यांना माफ करणार नाहीत. त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल, असेही डॉ. कदम म्हणाले. 

अनेकांनी व्यक्त केला निषेध
यावेळी अनेकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याबद्दल निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या तैलचित्राला जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी डॉ. सुनिल कदम यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी सदस्य कल्पना डोंगळीकर, शिख सेल प्रदेशाध्यक्ष जर्नलसिंग गाडीवाले, जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापुरकर, सय्यद मौला, उपाध्यक्ष बंटी लांडगे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष कन्हैय्या कदम, तातेराव आलेगावकर, भीमराव क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पडळकर यांनी माफी मागावी - भोसीकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते माफ करणार नाहीत व त्या वक्तव्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हरिहर भोसीकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी दिला आहे. बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. जात, धर्म व भावनिक मुद्यांचा वापर करून शरद पवार यांनी कधीच राजकारण केले नाही. याउलट पडळकर यांनी दहा वर्षांत दहा पक्ष बदलले आहेत. देवांच्या खोट्या शपथा घेत राजकारण करत स्वत:ची खळगी भरत आहेत. बिनबुडाच्या पडळकरांनी शरद पवार यांच्यावर गरळ ओकने थांबवावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजप पक्ष नेतृत्वाने शिस्तीचा टेंभा मिरवण्यापेक्षा पडळकरांना समज द्यावी व आपल्या पक्षाची शिस्त शिकवावी, असेही या पत्रकात म्हटले आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com