Video-नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे योगी सरकारचा निषेध

प्रमोद चौधरी
Tuesday, 6 October 2020

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हाथरस जिल्ह्यातील घटनेचा जाहीर निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

नांदेड : समाजात काळिमा फासणारी घटना हाथरस (उत्तरप्रदेश) येथे घडलेली आहे. मात्र, या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी योगी सरकार चालढकल करत आहे. त्याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीने मंगळवारी (ता.सहा) आयटीआय ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मानवी साखळी तयार केली होती. दरम्यान हाथरस घटनेतील आरोपींना फाशी देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.  

निवेदनात म्हटले आहे की, उत्तरप्रदेशमधील चंदपा (जि.हाथरस) येथे एका १९ वर्षिय मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिची निर्दयपणे हत्या करण्यात आली. हे कृत्य करणाऱ्यांना योगी सरकार पोलिसांना हाताशी घेवून पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. सामुहिक बलात्कारानंतर पिडीत मुलगी नऊ दिवसांनी शुद्धीवर आली. तिच्यावर दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, तिचा जीव वाचू शकला नाही. 

हेही वाचा - नांदेडला चोवीस तासानंतर सापडला डॉ. भगवान जाधव यांचा मृतदेह

आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी
आरोपींनी सामुहिक बलात्कार करून पिडितेची जिभ कापल्याने ती काहीच बोलू शकली नाही. इशाऱ्यानेच तिने सर्व घटना जबाबमध्ये सांगितली. त्यावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी संदीप, लवकूश, रामू आणि रवी अशा चार जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, आठ दिवस होवूनही त्यांच्यावर अद्याप कुठलीच कठोर कारवाई झालेली नाही. त्यामुळे चारही आरोपींना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली असल्याने त्यांना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी डॉ. संघरत्न कुहे, विठ्ठल गायकवाड, शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, चंद्रकला चापलकर, कौशल्या रणवीर, प्रज्ञा भाटेकोरे, अनिता कंधारे, कविता जावळे, निरंजना आवटे आदींनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.  

येथे क्लिक कराच - नांदेडला पिक विमा कंपन्यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन

अशी घडली घटना
उत्तरप्रदेश येथील चंदपा या गावामध्ये १४ सप्टेंबर रोजी पीडित मुलीवर सामुहित बलात्काराची घटना घडली होती. कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार बलात्कारानंतर तरुणीची जीभ कापून टाकण्यात आली होती. तसेच तिच्या पाठीचा मणकाही तोडण्यात आला होता. सोमवारी, ता. २८ सप्टेंबर रोजी तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा २९ सप्टेंबर रोजी अखेरचा श्‍वास घेतला. फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालामध्येही पीडीतेवर बलात्कार झाल्याचे पुरावे मिळाले नसल्याचे म्हणत अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी नवा वाद उभा केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest Of Yogi Government By Wanchit Bahujan Aaghadi Nanded News