‘सावलीत’ मिळालेली चतकोर भाकर ठरली लाखमोलाची !

bhokar.jpg
bhokar.jpg


भोकर, (जि. नांदेड) ः पालावरच आयुष्य हेच आमचं विश्व बनल आहे.‌.. ऊन, वादळ, वाळवारा तर आमच्या पाचवीला पुजलेलं आहे. आमची चंद्रमोळी पाल हेच काळीज आहे... टीचभर पोटाची भूक भागवून संसारगाडा हाकण्यासाठी रोजगाराच्या शोधात भ्रमंती होते... आमच्या भाळी सटवीन हेच प्रारब्ध अधोरेखित केले आहे. कसाबसा गाडा सुरळीत होता ‘कोरोनाने’ साऱ्या स्वप्नाचा चुराडा केला आणि आम्ही हातबल झालो. अशा संकटसमयी भोकरकरांच्या ‘सावलीत’ चतकोर भाकर मिळाली ती आमच्यासाठी लाखमोलाची ठरली, अशी भावूक प्रतिक्रिया मध्यप्रदेशातील कामगारांनी मंगळवारी (ता. १२) ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

शहरात मागील दीड महिन्यापासून लाॅकडाउन असल्याने मध्यप्रदेशातील ४४ कामगार अडकून पडले होते. प्रशासनाने त्यांना मंगळवारी (ता. १२) मोफत बससेवा देऊन त्यांच्या गावी सुखरूप रवाना केले आहे. परराज्यातील बहुतांशी कामगार कामाच्या शोधात सतत भटकंतीवर असतात महाराष्ट्रात बहुतांशी कामगार हे मध्यप्रदेशातील आहेत. तेथील काहीजण भोकर शहरात संवादिनी दुरुस्तीचे काम करून आपली उपजीविका भागविण्यासाठी गावकुसाबाहेर पाल टाकून बसले होते. अचानक कोरोना विषाणूंमुळे हाहाकार उडाला असून शासनाने यावर आवर घालण्यासाठी ‘लाॅकडाउन’ जाहीर केले. परिणामी सर्व व्यवहार ठप्प झाले. येथील कामगारावर उपासमारीची वेळ आली. अशा सकंट समयी शहरातील दानशूर सेवाभावी संस्था, व्यापारी संघटना, सावली प्रतिष्ठान भोकर विकास मंच, पत्रकार संघटना आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी गरजू कामगार मजूरदार यांना धान्याची किट भोजनदान दिले. यामुळे उपेक्षित असलेल्या कामगारांना दिलासा मिळाला आहे.


सावली प्रतिष्ठानचा सिंहांचा वाटा
लाॅकडाउन दिवसेंदिवस वाढत गेल्याने परप्रांतीय कामगार बाहेरगावांहून आलेले पोलिस व आरोग्य कर्मचारी, गरजवंत नागरिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अशा लोकांना दररोज मोफत भोजनाची व्यवस्था शहरातील सावली प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली. सतत ४८ दिवस ही सेवा अविरतपणे सुरू होती. अनेक दानशूर व्यक्तींनी या कामासाठी स्वंयस्फूर्तीने पुढाकार घेऊन सहकार्य केले आहे. यात ‘सावली’चा सिंहाचा वाटा आहे. यापूर्वी अनेक विधायक कामात सामाजिक बांधिलकी जोपासत माणुसकीचे दर्शन दाखविल्याने प्रशासनाने कौतुक केले आहे.


४४ कामगार बसने रवाना
शहरात अडकून पडलेल्या ४४ कामगारांना त्याच्या मूळ गावी जाण्यासाठी सरकारने दोन बसची मोफत सेवा उपलब्ध करून दिली आहे. मंगळवारी येथील आगारातून बस (एमएच १३ - सीव्ही ८६५) चालक एन. एच. वाघमारे, जी. आर. बोणे, दुसरी बस (एमएच १३ - सीव्ही ७२४९) चालक एम. एस. पोटजळे, एम. एम. भुजबळ यांनी जाण्याचे धाडस केले आहे. या वेळी आगार प्रमुख सुभाष पवार, नायब तहसीलदार संजय सोलनकर, संतोष कामठेवाड, मंडळ अधिकारी महेश वाकडे, एस. एस. चटलावार, बी. एन. मदने, श्‍यामसुंदर भोपेवार, एस. आर. घंटे, एल. एस. आनदेवाड, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती.


भोकरकरांनी काळजात घर केलं
शहरात अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या गावी रवाना करतांना बसस्थानकात सावली प्रतिष्ठान तर्फे पिण्याचे पाणी, भोजनाचे पाकिट, खाऊ वाटप करण्यात आला. भोकररांनी आमच्या दु:खात सहभागी होऊन दोन घास सुखाचे भरविले आहेत. नाही तर आम्ही भूकबळी ठरलो असतो. त्यांनी दाखविलेली माणुसकी आम्ही कदापि विसरू शकत नाही. ते देवासारखे धावून आलेत. भोकररांची ही आठवण आमच्या सदैव काळजात घर करून राहील. असा प्रसंग कुणावरही येऊ नये. भविष्यात आला तर मात्र भोकरकरांची नक्कीच याद येईल, असे सांगताना कामगार मंथू यादव यांचे डोळे पाणावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com