
जिल्हा तंबाखूमुक्त होण्यासाठी हवे सहकार्य
नांदेड - जगभरात जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून ता. ३१ मे हा दिवस साजरा केला जातो. सर्व शासकीय रुग्णालयात तंबाखू व्यसन मुक्ती केंद्र असून तेथे तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. व्यसन करणाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. नांदेड जिल्हा तंबाखूमुक्त होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी मंगळवारी (ता. ३१) केले.
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त श्री गुरूगोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या वतीने जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. भोसीकर बोलत होते. या फेरीत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हणमंत पाटील, डॉ. एच. टी. साखरे, प्राचार्य डॉ. रेणुकादास मैड, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश आहेर, बालाजी गायकवाड, समुपदेशक गजानन गोरे, नागेश अटकोरे तसेच शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक अपर्णा जाधव, राजेश्वरी देशमुख, विद्यार्थिनी आणि इंडियन डेंटल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
इंडियन डेंटल असोसिएशन यांच्यामार्फत मंगळवारी सर्व नोंदणीकृत डेंटल दवाखान्यात मोफत तपासणी शिबीर ठेवण्यात आले होते. पुढील १५ दिवस कर्करोग किंवा त्याआधीचे लक्षणाबाबत तपासणी सर्व डेंटल दवाखान्यात मोफत राहील, असे इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पांडुर्णीकर यांनी सांगितले.
Web Title: Public Awareness On The Occasion Of World No Tobacco Day In Nanded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..