बांधकाम विभागाचा थाट; रस्त्यांची लागली वाट

देगलुरातील वळग रस्ता मोजतोय अखेरची घटका
Public Works Department negligence of many roads currently in danger condition
Public Works Department negligence of many roads currently in danger conditionsakal

मरखेल : तालुक्यातील प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत केलेल्या रस्त्यांची अक्षरश वाताहत झाली आहे. रस्ते दुरुस्तीला प्राधान्य देण्याऐवजी बघ्याची भूमिका घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या बऱ्याच रस्त्यांची अवस्था खड्डेमय झाली असून, मरखेल शेजारील वळग रस्त्याची चाळण झालेली असताना दोनच महिन्यापूर्वी डागडुजीचे केलेले अर्धवट काम उखडून गेल्याने कामाची गुणवत्ता तपासणार कोण? हा प्रश्न आता चर्चिला जात आहे. मरखेल विभागातून जाणाऱ्या नांदेड- बिदर राज्य रस्त्यासह ग्रामीण भागातील वाडी- तांड्याला जोडणारे रस्तेही खड्डेमय झाल्याने वाहनधारक व प्रवाशांची मात्र कसरत होताना दिसून येत आहे.

मरखेलहुन शेजारील मुखेड तालुक्याला जोडणाऱ्या मरखेल- वळग या चार किलोमीटर रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे. या रस्त्याचे काम जवळपास दहा वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याकडे कुणी पाहिलेले नाही. या रस्त्यावरील प्रमुख पूल दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात वाहून गेलेले आहेत. या मार्गावरील शालेय विद्यार्थी, प्रवासी व वाहनधारकांनी मिळून पुलाची तात्पुरती दुरुस्ती केलेली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी वळग गावजवळ एक किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण स्थानिक गुत्तेदाराने केले आहे. परंतु एका मोठ्या नेत्याचा नातेवाईक असलेल्या या गुत्तेदाराच्या कामाकडे संबधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने हा रस्ता अल्प कालावधीचा ठरणार असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे. या रस्त्यावर जवळपास तीन किलोमीटर अंतरावर दुरुस्तीचे काम लाखो रुपये खर्च करून करण्यात आले. मात्र केवळ दोनच महिन्यात ‘जैसे थे’ परिस्थिती पहावयास मिळते.

याउपरही गतवर्षी करण्यात आलेल्या मरखेल- करडखेड रस्त्यावर वाळूच्या ओव्हरलोड वाहतुकीचा भार सहन झाला नसल्याने ठिकठिकाणी खचल्याचे दिसते आहे.

लाखो रुपये खर्चूनही रस्ता अपूर्ण

मरखेलजवळ मोठमोठे खड्डे पडले असून, सध्या दुरुस्ती प्रगतीपथावर आहे. परिसरातील व शेजारच्या तेलंगणा व कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान मष्णेर याठिकाणी जाण्यासाठी दोन पर्यायी रस्ते आहेत. त्यातील लोणी ते मष्णेर या रस्त्यासह मरखेल- सावळी मार्गे मष्णेर जाणारा रस्तादेखील खड्यांच्या गर्तेत सापडला असल्याने याठिकाणी येणाऱ्या भाविकांची परवड होताना दिसून येत आहे. मरखेल- झरी या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने आतापर्यंत लाखो रुपये खर्चूनही पूर्ण रस्ता होऊ शकला नाही.

चालत जाण्याशिवाय पर्याय नाही

मरखेल गटातील देवापुर व येरगीच्या ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर असलेल्या होट्टल रस्त्याचीही दुर्दशा झाली आहे. तेलंगणा व कर्नाटकच्या सीमेवरील मोतीराम तांडा याठिकाणी जायचे झाल्यास चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. वाहनाने जायचे ठरवल्यास कर्नाटकातून जावे लागते हे येथील वास्तव चित्र आहे. रस्त्यांची झालेली चाळण, रस्ते दुरुस्ती व झालेल्या निकृष्ट कामसंबंधी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर नाईक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन स्वीकारला नाही.

मरखेल ते वळग हा रस्ता अत्यंत दयनीय झाला आहे. वाहन चालवताना आम्हाला जीव मुठीत धरून जावे लागते. तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करून आमचा प्रवास सुखरूप होईल या दृष्टीने बांधकाम विभागाने लक्ष द्यावे.

- उमाकांत सूर्यवंशी वळगकर, वाहनचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com