अर्धापुरात विना मास्क फिरणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई

लक्ष्मीकांत मुळे
Monday, 22 February 2021

अधिकारी व पदाधिकारी उतरले  रस्त्यावर., सोळा हजार दंड वसूल..

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : कोरोनाचा वाढती रुग्ण लक्षात घेता प्रतिबंधाकत्मक उपाय योजनांची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. विना मास्क फिरणा-यांविरूध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. ही कार्यवाही करण्यासाठी पदाधिकारी व अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. तर शहरातील उपहारगृह, मंगलकार्यालय, खासगी आस्थानांच्या मालकांना नोटीस देवून योग्य त्या उपाययोजनांची खबरदारी घेण्याची कळविले आहे. नियमांचे उल्लंघन करणाविरूध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. विना मास्क फिरणा-यांना पाचशे रूपये दंड आकरण्यात येत आहे.

कोरोना रूग्णांची संख्या वाढत आसल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शासनाने  व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे युद्ध पातळीवर अंमलबजावणी नगरपंचायत, तहसील व पोलिस विभाग पालन करीत असून प्रशासनाने रविवार (ता. 21 ) धडक कार्यवाही सुरू केली.

शहरातील बसवेश्वर चौक, बसस्थानक परिवारात विना मास्क फिरणारे नागरिक, वाहनचालक यांना थांबवून दंड आकारला गेला. अचानक झालेल्या कार्यवाहीने नागरिक चांगलेच भांबावून गेले. शहरातील उपहारगृह, मंगलकार्यालय, किरणा दुकान, गर्दी होण्याचे ठिकाण, विविध व्यावसायीक यांना नोटीस देवून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी कळविण्यात आले आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवणे, मास्कचा वापर करणे, सॅनीटायझरचा नियमित वापर करणे,योग्य अंतर ठेवून संभाषण करणे आदी सुचना देण्यात आल्या आहेत.

नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी मारोतराव जगताप,डाॅ विशाल लंगडे, शेख लायक, स्वच्छता अधिकारी गवळी, मदन डाके, कैलास गायकवाडच्या,शिवाजी कांबळे, शिवानंद खंडागळे, शिवाजी वाघमारे आदी अधिकारी व कर्मचारी या विशेष मोहीमेत सहभागी झाले. या कार्यवाहीत 16 हजार 200 दंड वसूल करण्यात आला.

शहरातील सर्व खासगी आस्थापने, किरणा दुकान, मंगलकार्यालयांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणा-याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येईल आशी माहिती प्रभारी मुख्याधिकारी मारोतराव जगताप यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punitive action against those walking without masks in Ardhapur nanded news