झेडपी मुख्यालयात आता मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी - कसे ते वाचा 

नवनाथ येवले
सोमवार, 1 जून 2020

यंत्रातील बिघाड दूरुस्त करुन शनिवारी मुख्यालय इमारतीमध्ये आरो फिल्टर पुर्ववत करण्यात आल्याने नागरिकांना तहान भागवण्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. 

नांदेड : जिल्हा परिषद मुख्यालयातील कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आता शुद्ध आरो फिल्टर (जलशुद्धीकरण यंत्र) द्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. यंत्रातील तांत्रिक अडचण, किरकोळ दूरुस्तीमुळे गेल्या तीन महिण्यापासून साधनाअभावी येथील मुख्यालयाचा शुद्ध पाणीपुरवठा खंडीत झाला होता. यंत्रातील बिघाड दूरुस्त करुन शनिवारी मुख्यालय इमारतीमध्ये आरो फिल्टर पुर्ववत करण्यात आल्याने नागरिकांना तहान भागवण्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. 

जिल्हा परिषद मुख्यालय इमारतीच्या बांधकाम दूरुस्तीमुळे सात महिन्यापासून विविध कार्यालयांना सुविधांचा खंड पडला. इमारतीच्या विशेष दूरुस्तीमुळे वीज, पाणी यासह इंटरनेट अभावी अधिकारी, कर्मचाऱ्यांना अडचणींचा समाना करावा लागला. इमारतीमधील वापरात नसलेल्या खोल्यांमधील घन-कचराही दूरुस्तीमुळे स्वच्छ करण्यात आला. दरम्यान, तीन मजली मुख्यालयास आरो फिल्टरचे शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी मागील वर्षी विशेष निधीतून पाचशे लिटर क्षमतेच्या आरो फिल्टरची तरतुद केली. 

हे ही वाचा -  लॉकडाउनचा फटका : किरायदार निघून गेल्याने घरमालक भाडेकरूंच्या शोधात ​

इमारतीच्या छताची गळती थांबवण्यासाठी बांधकाम दूरुस्तीमुळे तीन महिन्यापूर्वी छतावरील आरो फिल्टर कंत्राटदाराने हलविले होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अभ्यांगतांना मोलाच्या पाण्यावर तहान भागवावी लागली. जिल्ह्याच्या मुख्यालयातच शुद्ध पाण्याअभावी तहान भागवण्याची कसरत करावी लागत असल्याच्या संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होत होत्या. जिल्हा परिषद वाहन चालक संघटनेचे गणेश अंबेकर यांनी संघटनेच्या वतीने आरो फिल्टरबाबत पाठपुरवा करुन पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणुन दिली.

जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, बांधकाम सभापती संजय बेळगे, कार्यकारी अभियंता (उत्तर) श्री.करपे यांच्या सुचनेनुसार शनिवारी इमारतीच्या छतावर आरो फिल्टर यंत्र पुर्ववत करण्यात आले. आरो फिल्टरद्वारे सुरळित शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी यंत्रातील साहित्यांची सफाई, टाक्यांची सफाई, पाणी सोडणे व त्यानंतर वेळेत बंद करण्यासह संपुर्ण यंत्राच्या देखभालीसाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती गरजेची आहे. मुख्यालयास शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या आरो फिल्टर यंत्राचेही नव्याचे नऊ दिवस होण्यास वेळ लागणार नाही. 

येथे क्लिक करा - नांदेडकरांना सोमवारने दिला धक्का, पुन्हा तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यातील बांधकाम विभाग दक्षिण, बांधकाम विभाग उत्तर, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग या शिवाय दोन सभापतींचे निजीकक्ष, दुसऱ्या मजल्यातील जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या कक्षासह, सामन्य प्रशासन विभाग, महिला व बाल कल्याण सभापती कक्ष, पंचायत विभाग, महाराष्ट्र ग्रामीण योजना विभाग, वित्त विभाग व पहिल्या मजल्यातील सन्माननीय जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा यांचा निजी कक्ष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जल संधारण (ल.पा) विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) यासह तळमजल्यावरील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह अभ्यांगतांना आता शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pure drinking water will now be available at ZP headquarters - read how,Nanded News