esakal | विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरच घाला, काय आहे प्रकरण ? वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

डुप्लिकेट पुस्तकांचा भरला बाजार, बारावीचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी बनावट

विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरच घाला, काय आहे प्रकरण ? वाचा...

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : विज्ञान शाखेत शिक्षण घेणारे विद्यार्थी पुढे वैद्यकीय, अभियांत्रीकी शाखेत आपले भविष्य घडवितात. त्यांच्यासाठी पालक पाहिजे तेवढा शिक्षणावर खर्च करतो. त्यांच्या अभ्यासासाठी शिक्षकांनी सांगितलेले सर्व अभ्यासाचे साहित्य पुरविल्या जातात. मात्र आता तर थेट बाजारात बनावट पुस्तके तयार करून विद्यार्थ्याच्या अभ्यासावरच घाला घातल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांमध्ये चांगलाच  गोंधळ उडाला आहे. 

पुस्तके मस्तक सशक्त करतात हे विचारवंतांनी सांगून गेले. हे त्रिकालाबाधित सत्य असले तरी विद्यार्थ्यांच्या माथी डुप्लिकेट पुस्तके मारली जात असतील तर त्याचे परिणाम काय असतील हे वेगळे सांगायची गरज नाही. सध्या बाजारात कोरोना लाॅकडाउनचा गैरफायदा उचलत बनावट पुस्तके विक्री होत आहेत. इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयाची बनावट पुस्तक विद्यार्थ्यांच्या माथी मारली जात असल्याने डुप्लिकेट पुस्तके जप्त करावीत अशी मागणी समोर आली आहे. ग्राहक पंचायतीने याकडे सरकारचे लक्ष वेधले असून या गंभीर प्रकरणाचे निवेदन मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना दिले आहे.

हेही वाचा - गुरुद्वारा बोर्डाचे दोन सदस्य का झाले निलंबित... वाचा सविस्तर

टाळेबंदी दरम्यान डुप्लिकेट पुस्तके विक्रीसाठी दाखल 

कोरोना साथीमुळे शैक्षणिक व्यवस्था ठप्प झाली आहे. परंतु काही दिवसापूर्वीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुस्तकाच्या दुकानाला परवानगी दिली गेली. पुस्तकाची दुकाने दिलेल्या वेळेत उघडली जात असली तरीही इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या पुस्तक छपाईचे काम बालभारतीकडे आहे. त्यांची पुस्तके लॅाकडॉउनमुळे वेळेवर उपलब्ध झाली नव्हती. या संधीचा फायदा घेत टाळेबंदी दरम्यान डुप्लिकेट पुस्तके विक्रीसाठी दाखल झाले आहे. पहिली ते आठवीची पुस्तके वेळेवर उपलब्ध झाल्याने त्याचे वितरण सुरू असले तरी माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध होण्यास विलंब झाला. नेमके याचवेळी मोठ्या प्रमाणात हुबेहूब दिसणाऱ्या बनावट पुस्तकांना बाजारात उतरविण्यात आले. 

पुस्तके बाजारात उतरवणारी मोठी साखळी

इयत्ता बारावी विज्ञान शाखेची फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयाची बनावट पुस्तके विद्यार्थ्यांना विक्री करण्यात आले. या पुस्तकांच्या कागदाचा    दर्जा निकृष्ट असून पुस्तकात मुद्रणदोष आहेत. मुखपृष्ठ सारखेच दिसत असले तरी ही पुस्तके बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. बनावट पुस्तकाची विक्री संपूर्ण राज्यभरात झाल्याचा अंदाज असला तरी नांदेड शहरातील श्रीनगर, आनंदनगर, भाग्यनगर तसेच लोहा, मुखेड, देगलूर यासह अनेक  तालुक्यातून पुस्तकांची सर्रास विक्री झाल्याचे सांगितले जाते. यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शाळा, कॉलेज बंद असले तरी डुप्लिकेट पुस्तकामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. तेव्हा शिक्षण विभागाने तातडीने बनावट पुस्तके जप्त करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या बनावट कारभारात अनेकांचा सहभाग असू शकतो. सुनियोजित पद्धतीने पुस्तके बाजारात उतरवणारी मोठी साखळी बसू शकते. त्यामुळे ही बनावट पुस्तके कुठून तयार होऊन विक्रेत्यापर्यंत कोणी पोहोचवली याचा तपास होणे गरजेचे आहे. असे ग्राहक पंचायत महाराष्ट्र नांदेडचे अध्यक्ष अरविंद बिडवई, संघटक बालाजी लांडगे, ग्राहक संरक्षण परिषद सदस्य रमाकांत घोणशीकर यांनी म्हंटले आहे.