आता ‘या’ साठी लागल्या नांदेडमध्ये रांगा...

नांदेडला वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी रांग
नांदेडला वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी रांग

नांदेड - इतर राज्य तसेच जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांना आपआपल्या मूळ गावी परतण्यासाठी शासनाने परवानगी दिली असली तरी यासाठीची प्रक्रिया किचकट असल्याने या नागरिकांची परत जाण्याची वाट खडतरच असल्याचे चित्र आहे. या नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयात रांगा लावत मोठी गर्दी केली आहे.  

शासनाने परराज्यातील मजूर, कामगारांसह इतर नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी देण्याचे धोरण घेतले आहे. त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारकडून या मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. त्यासाठी वैद्यकीय तपासणी करुन प्रमाणपत्र घेणे आवश्‍यक आहे. आनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना जाण्याची रितसर परवानगी प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

नोंदणीसाठी संकेतस्थळ उपलब्ध
कोरोनामुळे लॉकडाउन सुरु असून अनेकजण बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातील असल्याने नांदेडमध्ये अडकलेले आहेत. अशा नागरिकांना आपआपल्या गावी जाण्यासाठी राज्य शासनामार्फत नोंदणीसाठी संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या संकेतस्थळावर परिपूर्ण माहितीसह छायाचित्र व इतर आवश्‍यक कागदपत्रांची प्रत अपलोड करुन माहिती नोंद केल्यानंतर संबंधित अर्जदारास आनलाइन टोकन क्रमांक प्राप्त होणार आहे. 

आरोग्य तपासणीसाठी रांगा
नोंदणीसाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांकडून तपासणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळेच दोन दिवसापासून शहरातील श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी रांगा लागत आहेत. त्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. ही रांग रुग्णालयापासून वजिराबाद चौरस्त्यापर्यंत गेली आहे. रांगा लावून तपासणी करुन घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा आनलाइन अर्ज दाखल करण्यासाठीचे आव्हानही या नागरिकांसमोर आहे. त्यामुळे या नागरिकांचा घरी जाण्याचा मार्ग सध्यातरी खडतरच आहे. 

अनेक राज्यातील नागरिकांचा समावेश
नांदेडला बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी राज्यातील मजूर, कामगार अडकून पडले आहेत. काही नांदेड जिल्ह्यातून प्रवास करताना पोलिस व प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. प्रशासनाने नांदेड जिल्ह्यात देगलूर, लोहा, कंधार, मुखेड, नांदेड, किनवट आदी ठिकाणी सुमारे २१ केंद्रामध्ये मजुर, कामगारांची निवास व भोजनाची व्यवस्था केली होती. त्यापैकी काही जणांनी आता मूळ गावी जाण्याची इच्छा प्रशासनाकडे व्यक्त केली आहे. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. 

नोंदणीसाठी संकेतस्‍थळ उपलब्‍ध
नांदेड जिल्ह‍यात तसेच इतर राज्‍यातील किंवा इतर जिल्‍ह्यातील नागरीक, विद्यार्थी लॉकडाऊनमुळे नांदेड जिल्‍ह्यात अडकलेले आहेत, अशा नागरिकांना आपआपल्‍या गावी जाण्‍यासाठी राज्य शासनामार्फत नोंदणीसाठी https://covid19.mhpolice.in/ हे  संकेतस्‍थळ उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे. या संकेतस्‍थळावर परीपुर्ण माहितीसह छायाचित्र व इतर आवश्‍यक कागदपत्रांची प्रत अपलोड करून माहिती नोंदणी केल्‍यानंतर आपणास ऑनलाइन टोकण क्रमांक प्राप्‍त होईल. हा ऑनलाईन टोकन क्रमांक त्‍याच संकेतस्‍थळावरून डाऊनलोड पास या ऑपशनवर आपला टोकण क्रमांक नोंदवून पासची प्रिंट काढुन घेता येईल. या पास नोंदणीसाठी आपणास नोंदणीकृत वैद्यकीय व्‍यावसायिक याचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच आपण कंटेनमेंट झोनमधील व्‍यक्‍ती नसावेत, आपण जाणारे ठिकाण हे देखील कंटेनमेंट झोनमधील नसावे. अधिक माहितीसाठी 02462 - 235077 या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच collectornanded1@gmail.com हा ई-मेल नांदेड जिल्‍हा प्रशासनाकडून उपलब्‍ध करून देण्‍यात आलेला आहे.
     

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com