esakal | मराठवाड्यातून भोपाळला मजूरांसाठी रेल्वे, मुंबईसह पुण्यात अडकलेल्यांचे काय ?  
sakal

बोलून बातमी शोधा

railway

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत विविध राज्यातील हजारो कामगार अडकले आहेत. त्यांच्यासाठी आज गुरुवारी (ता.सात) औरंगाबादला एक रेल्वे नांदेडहून पाठविण्यात आली. ही रेल्वे सर्व प्रक्रीया पार पडल्यावर गुरुवारी रात्री येथून प्रवासाला निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक परप्रांतिय मजूरांच्या जाण्याची सोय झाली आहे. परंतू, मराठवाड्यातील अनेक जण पुणे, मुंबई येथे अडकले आहेत, त्यांच्यासाठी विशेष रेल्वे कधी सोडणार, हा प्रश्‍न सध्यातरी अनुत्तरित आहे.  

मराठवाड्यातून भोपाळला मजूरांसाठी रेल्वे, मुंबईसह पुण्यात अडकलेल्यांचे काय ?  

sakal_logo
By
राजन मंगरुळकर

नांदेड ः मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली येथे परप्रातांतीन हजारो मजूर अडकले आहेत. ज्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगालसह आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जिल्हा प्रशासनासह काही लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यावर दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने येथील मजुरांसाठी औरंगाबाद येथून विशेष रेल्वे सोडण्याची प्रक्रीया पुर्ण केली आहे. ही रेल्वे गुरुवारी रात्री भोपाळकडे रवाना होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही राज्यातील मजूर या रेल्वेने जाणार आहेत. मात्र, मुळ मराठवाड्यातील पुणे, मुंबई येथे अडकलेल्यांच्‍याबाबत अद्याप कोणतीही विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय झालेला नाही, हेही तेवढेच खरे.   

महाराष्ट्रातील विविध शहरांत अडकलेल्या परराज्यातील मजुरांना गावी परतण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्या-त्या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाने कळविलेल्या मजूर संख्येवरून मागील पाच दिवसांत काही रेल्वे परराज्यातील शहरात सोडल्या आहेत. यामध्ये नाशिक, अकोला, नागपूर येथील हजारो मजूर विशेष श्रमिक रेल्वेने रवाना झाले. यानंतर आता औरंगाबाद येथून गुरुवारी रेल्वे रवाना होत आहे. सदरिल रेल्वे औरंगाबाद येथून भोपाळला रवाना होणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांनी दिली.              

हेही वाचा - दिलासादायक : ‘त्या’ चार पॉझिटीव्हपैकी एक सापडला

विशेष रेल्वेची मागणी ः अशोक चव्हाण
इतर राज्यातील कामगार, मजूर तसेच इतर नागरिक नांदेड शहर आणि जिल्ह्यात लॉकडाउनमुळे अडकले आहेत. त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वेची किंवा इतर पर्यायी व्यवस्थेची मागणी करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. या बाबत केंद्र सरकारकडे राज्यामार्फत तसेच मीदेखील मागणी केली आहे. नांदेड रेल्वेस्थानकावरून विशेष रेल्वे सोडण्याची मागणी करण्यात आली असून जिल्हा प्रशासन आणि नांदेड रेल्वे विभागाला माहिती देण्यात आली आहे. 

हेही वाचा - परभणीच्या वातावरणात होत आहेत बदल : कोणते ते वाचा

पुणे, पनवेल येथून नांदेड रेल्वे सोडा - संजय जाधव, खासदार 
मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यातील हजारो नागरिक पूणे परिसरात अडकलेले आहेत. आज सर्व ठप्प असल्याने त्यांच्या हाताला काम नाही. त्याचबरोबर हजारो विद्यार्थी पूणे जिल्ह्यात शिक्षणासाठी गेलेले अडकलेले आहेत. त्यांचे कुटुंबीय इकडे चिंतेत आहेत.त्यांना मराठवाड्यात आणण्यासाठी पनवेल-नांदेड रेल्वे चार-पाच दिवस सोडण्याची गरज आहे. त्या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली होती. त्याचबरोबर ट्विटरवर पण मागणी केली होती. परंतु, त्याबाबत रेल्वे मंत्रालयाने काहीही भूमिका घेतली नाही. आता ज्याप्रमाणे परप्रांतियांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडल्यात तशीच पनवेल ते नांदेड अशी रेल्वे तत्काळ सोडून विद्यार्थी व नागरिकांना दिलासा द्यावा. 


नेहमीप्रमाणेच इथेही सापत्न वागणूक 
मराठवाड्यातील रेल्वे प्रश्‍नांवर आवाज उठविल्यावरही नेहमीच निराशा सहन करावी लागते. तसाच काहीसा प्रकार लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मजूरांच्या बाबत आणि आपल्याकडील पुण्या-मुंबईत अडकलेल्यांच्या बाबत सध्या घडला आहे. नुकतीच मुंबई येथून गुंटकूल येथे रेल्वे सोडण्यात आली, तर मग मराठवाड्यातून का रेल्वे सोडली जात नाही? दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नांदेड, औरंगाबाद येथून रेल्वेची घोषणा करावी. 
- अरुण मेघराज, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ.   

लोकप्रतिनिधी व जनतेच्या मागणीनुसार रेल्वे 
लोकप्रतिनिधी व जनतेच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने औरंगाबाद येथून परप्रांतात जाणाऱ्या मजूरांसाठी विशेष रेल्वे औरंगाबादला रवाना केली आहे. त्या रेल्वेत जाणाऱ्या प्रवाशांविषयी राज्य शासन त्यांच्या नियम व निकषाने परवानगी देत आहे. राज्य शासनाच्या निकषाष पात्र ठरलेल्या व त्यांनी ठरविलेल्या प्रवाशांना घेऊन सदरिल रेल्वे संध्याकाळी परप्रांतात रवाना होइल.   
- भूपिंदर सिंग, डीआरएम, नांदेड.