अबब...पिककर्जासाठी अर्जाचा पाऊस....कुठे ते वाचा

कृष्णा जोमेगावकर
Monday, 8 June 2020

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात बँकेतील गर्दीमुळे विषाणू संसर्ग टाळावा व बँकेच्या सेवा अधिक सुरक्षित व्हाव्यात, यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन कर्ज मागणी सुविधा उपलब्ध करुन दिली होती.

नांदेड : खरीप हंगाम २०२० - २०२१ साठी जिल्ह्यातून ऑनलाइन अर्जाचा पाऊस पडला आहे. सोमवार (ता. आठ) अखेर दोन लाख ४३ हजार शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी ऑनलाइन  मागणी अर्ज सादर केले आहेत. पेरणीचा हंगाम असल्याने संबधीत बॅंकांकडून तत्काळ शेतकऱ्यांना पिककर्ज देण्याची प्रक्रिया लवकर सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पहिल्या टप्यात एक लाख सत्तर हजार अर्ज
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात बँकेतील गर्दीमुळे विषाणू संसर्ग टाळावा व बँकेच्या सेवा अधिक सुरक्षित व्हाव्यात, यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन कर्ज मागणी सुविधा उपलब्ध करुन दिली होती. यात जिल्ह्यातील पीककर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाइन पीककर्ज मागणी नोंदणीसाठी प्रारंभी ता. १७ मे ते ता. २७ मे दरम्यान अर्ज करण्याबाबत मुदत दिली होती. या कालावधी दरम्यान जिल्ह्यात एक लाख ७० हजार २४० शेतकऱ्यांनी ऑनलाइन संकेतस्थळावर पीककर्ज मागणी नोंदविली. 

हेही वाचा....

मुदतवाढीनंतर दोन लाख वीस हजार अर्ज  
यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन तसेच जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी ऑनलाइनसाठी शनिवार (ता. सहा) जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. 
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये यासाठी ऑनलाइन कर्ज मागणी करण्याचे आवाहन केले होते. यानुसार पहिल्या टप्प्यात ता. १७ ते २७ मे या दहा दिवसांत जिल्ह्यातील एक लाख ७० हजार २४० शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिली. 

हेही वाचलेच पाहिजे....

सोमवारपर्यंत दोन लाख ४३ हजार नोंदणी 
ता. २७ मेनंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ऑनलाइन अर्जासाठी ता. सहा जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे ता. चार जूनपर्यंत जिल्ह्यात दोन लाख २० हजार शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. दरम्यान सोमवारपर्यंत (ता. आठ) जिल्ह्यातील दोन लाख ४३ हजार शेतकऱ्यांनी पिककर्जासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. 

पात्र शेतकऱ्यांना येणार लघू संदेश
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची ही यादी जिल्हा अग्रणी बँक, नांदेडमार्फत संबंधित बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. सदर यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. बँकेमार्फत लघुसंदेश प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेने दिलेल्या तारखेस त्यांचे आधारकार्ड, सातबारा, आठ -अ, फेरफार नक्कल, पॅनकार्ड, टोचनकाशा, पासपोर्ट साईज दोन फोटो, पासबुक या कागदपत्रासह बँकेत उपस्थित राहावे. अंतिम पीक कर्ज मंजुरी किंवा नामंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain of application for crop loan .... read it where