esakal | Nanded Rain Update: गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मानार नद्या दुथडी भरून वाहू लागल्या
sakal

बोलून बातमी शोधा

गोदावरी

येथील विष्णुपुरी धरणाचे पंधरा दरवाजे उघडून गोदावरीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे

Nanded Rain: गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मानार नद्या दुथडी भरून वाहू लागल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात बुधवारी (ता. आठ) पावसाने उघडीप दिली असली तरी गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मानार या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. येथील विष्णुपुरी धरणाचे पंधरा दरवाजे उघडून गोदावरीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात १६८.४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी ५३.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सहा तालुक्यांसह ३१ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९६२.४० मिलिमीटर पाऊस झाला असून त्याची टक्केवारी १०७.९८ आहे.

विष्णुपुरी धरणातून सातत्याने पाण्‍याचा विसर्ग केला जात असून आज १५ दरवाजांतून दोन लाख ४१ हजार ५१८ क्युसेकने गोदावरीत विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी कमी झालेली नाही. नांदेड येथील जुन्या पुलावर सायंकाळपर्यंत पाणीपातळी ३५२.४० मीटर इतकी आहे. इशारा पातळी ३५१ तर धोका पातळी ३५४ मीटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग दोन लाख १३ हजार क्युसेक व धोका पातळीचा विसर्ग तीन लाख नऊ हजार ७७४ क्युसेक आहे.
ऊर्ध्व मानार प्रकल्प व निम्म मानार प्रकल्पही शंभर टक्के भरला आहे. ऊर्ध्व पैनगंगा धरण ९४.९ टक्के भरल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास पाणी सोडण्यात येईल, अशा इशारा नांदेड पाटबंधारे विभागाने दिला आहे. जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मानार या नद्या सध्या दुथडी भरून वाहत असून या नद्यांच्या काठच्या गावांतील नागरिकांनी अधिक सतर्क राहून जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सासूबाईंचे निधन

बाधितांची निवारा केंद्रात व्यवस्था-
जिल्हा प्रशासनाकडून जीवित हानीसह जनावरे, घरांची पडझड तसेच शेती पिकांच्या नुकसानीबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे बाधित झालेल्या ५८० घरांतील नागरिकांची महापालिकेतर्फे तात्पुरत्या निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे मोफत भोजनाचीही व्यवस्था आहे.

नेत्यांकडून नुकसानाची पाहणी-
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज अतिवृष्टी झालेल्या काही भागांना भेट देऊन पाहणी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी बैठक घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण गुरुवारी (ता. नऊ) पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

हेही वाचा: किती कोविड रुग्णांवर उपचार, रुग्णालयांवर कारवाई केली? खंडपीठाचा सवाल

मराठवाड्यातील १४५ मंडळांत अतिवृष्टी-
औरंगाबादः औरंगाबादसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत मंगळवारी (ता.७) पावसाने झोडपून काढले. तब्बल १४५ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ४४, जालना १५, बीड २२, लातूर ६, उस्मानाबाद १, नांदेड ३१, परभणीतील २६ मंडळांचा समावेश आहे.

loading image
go to top