Video-नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे रास्तारोको आंदोलन

प्रमोद चौधरी
Friday, 9 October 2020

यंदा पीक चांगले आले असतानाही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शासनाने जलद गतीने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी मागणी केली आहे. 

नांदेड : मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत कोणत्याही स्पर्धात्मक परिक्षा घेऊ नयेत यासह इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी नांदेड ते हैद्राबाद रोडवरील कौठा पाटीवर रास्तारोको आंदोलन केले. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ५० हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, पिकविमा मंजुर करावा, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या लवकरात लवकर प्रसिद्ध करुन तात्काळ त्यांना पिककर्ज द्यावे, उत्तरप्रदेशातील हाथरस घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे रास्तारोको आंदोलन केले. 

पिककर्ज माफ केले म्हणुन शासनाने पिककर्जाएवढे पैसे कर्जमाफीच्या जाहिरातीत घातले; पण आणखी काय कर्जमाफीच्या याद्याच पुर्ण आल्या नाहीत काही शेतकर्याचे माफ झाले तर काहीचे झाले नाही.  सरसकट पिककर्ज माफ करून नवीन पिककर्ज लवकर द्यावे, तसेच पिकविमाही मंजुर करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष  शाम पाटील यांनी व्यक्त केले. उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील मुलीवर झालेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे. 

हेही वाचा - कोरोना ‘खाटां’ची खरी खोटी, विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील ४० खाटांचे गणित जुळेना

मराठा आरक्षण जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह इतरही स्पर्धात्मक परिक्षा व नोकरभरती शासनाने रद्द केली पाहिजे.  सात एप्रिल रोजी होवु घातलेल्या परिक्षा शासनाने कोरोनामुळे पुढे ढकलल्या आहेत. मग कोरोना संपला नसतांनाही आरक्षणावर स्थगिती आल्याआल्याच शासन का परिक्षा घेण्याची घाई करत आहे? अकरा एप्रिल रोजी होणारी परिक्षा पुढे ढकलावी अन्यथा परिक्षा केंद्रावर एकाही परीक्षार्थिला तसेच कर्मचाऱ्यांना येऊ देणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

हे देखील वाचाच - बांगडी विक्रेत्याच्या मुलीचे भन्नाट यश : क्लास न लावता घरी राहून अभ्यास करत मिळवला आयआयटीत प्रवेश

वाहनांच्या लांबच लांब रांगा
शुक्रवारी सकाळी सुमारे अकरा वाजेच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदेड-हैद्राबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरु असल्याने दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास अर्धा ते एकतास हे आंदोलन सुरुच होते. आंदोलनकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, शाम पाटील, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष कृष्णा मोरे, ज्ञानेश्वर शिंदे,  माधव घोरबांड आदींसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rastaroko Andolan By Sambhaji Brigade for Maratha Reservation Nanded News