महावितरणच्या संवाद मेळाव्यात काय घडले ?...वाचा 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

लोकप्रतिनिधींची प्रत्यक्ष भेट घेवून केले तक्रारी व शंकांचे निवारण, लॉकडाऊन काळातील वीजबील तक्रारी

नांदेड : लॉकडउनच्या कालावधीत ग्राहकांनी केलेल्या वीजवापराचे प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर संगणीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मे महिन्यासह जूनचे देण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाबाबत निर्माण झालेला संभ्रम व शंकांचे निवारण करण्याच्या हेतूने नांदेड परिमंडळाच्या वतीने ग्राहक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या संवाद मेळाव्याची सुरवात लोकप्रतिननिधींची प्रत्यक्ष भेट घेवून वीजग्राहकांना देण्यात आलेली वीजबीले कशा पध्दतीने देण्यात आली असून, ती योग्य असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट घेवून मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता संतोष वहाणे तसेच कार्यकारी अभियंता श्याम दासकर यांनी वीजबीलाबाबत ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण झालेला संभ्रम दुर करण्याच्या दृष्टिने उपविभागनिहाय ग्राहकसंवाद मेळावे आयोजीत केल्याची माहिती देण्यात आली. तसेच लॉकडाउनच्या काळात चोवीस तास वीजपुरवठा करण्यात आला असून सर्वजण घरातच असल्यामुळे विजेचा वापर मोठयाप्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले आहे.
 
विजबिलाबाबत सविस्तर माहिती

त्यामुळेही वीजबील जास्त येण्याचे हे ही एक कारण असल्याचे सांगीतले. लॉकडाउन काळात सरासरी पध्दतीने आकारण्यात आलेली वीजदेयके जून मध्ये प्रत्यक्ष रिडींगनुसार देण्यात आलेल्या वीजबीलात वजाकरून देण्यात आल्याची माहितीही दिली. तसेच रिडींग चुकली असल्यास त्याची त्वरीत दुरूस्ती करून वीजग्राहकांच्या शंकांचे निवारण करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आमदार राजेश पवार यांचीही भेट घेवून कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावार व मोहन गोपुलवाड यांनी विजबिलाबाबत सविस्तर माहिती दिली.

हेही वाचानांदेडकरांनो सावधान: कोरोना पाय पसरतोय, गर्दी टाळा

नांदेड शहर विभागातील ६० वीजग्राहकांची देयके

आजपासून सुरू करण्यात आलेल्या ग्राहकसंवाद मेळाव्यात नांदेड शहर विभागातील ६० वीजग्राहकांची देयके तपासून ग्राहकांच्या तक्रारींचे निरसण करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता भूषण पहूरकर यांनी दिली. त्याचबरोबर कंधार उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महेश वाघमारे यांनी मौजे काटकळंबा, हळदा येथे ग्राहक संवाद मेळावा आयोजीत करून ६५ वीजग्राहकांच्या वीजबिलासोबतच इतरही वीजेच्या समस्या सोडविल्या.

ता. २९ जून रोजी  कंधार उपविभागात

मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांनी सर्व कार्यकारी अभियंत्यांना निर्देश दिले आसून शाखा कार्यालय ते विभागीय कार्यलय स्तरावर लॉकडाउनच्या काळातील वीजबील कशा पध्दतीने आकारले आहे याची माहिती देणारे फ्लेक्स बोर्ड दर्शनी भागात लावावेत व ग्राहकसंवाद मेळावे आयोजीत करून ग्राहकांच्या मनामधील संभ्रम दुर करावा असे निर्देश दिले आहेत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींची भेट घेवून व पत्र देवून बिलाबाबत सविस्तर माहिती देण्याच्याही सुचना केल्या. दिनांक ता. २९ जून रोजी उमरी, हदगाव, हिमायत नगर, किनवट, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, कंधार उपविभागामध्ये ग्राहकसंवाद मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. 

येथे क्लिक करा - धक्कादायक..! आमदाराच्या कुटुंबातील ९ जण पॉझिटिव्ह

भोकर उविभागात ता. ३० जून रोजी

तसेच ता. ३० जून रोजी भोकर, माहूर, देगलूर, बिलोली, एमआयडीसी नांदेड, मुदखेड आदी उपविभागामध्ये संवाद मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. ज्या वीजग्राहकांना आपल्या बिलाबाबत शंका असेल त्यांनी संबंधीत उपविभागाच्या अभियंत्यांशी कोवीड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करत संपर्क करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read what happened at MSEDCL's dialogue meet nanded news