सुकन्या समृद्धी योजनेत काय झाला बदल? ते वाचाच

प्रमोद चौधरी
Tuesday, 11 August 2020

१० ऐवजी आता १८ वर्षापर्यंतच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. त्यामुळे लाभार्थी पाल्यांना नव्या नियमांचा लाभ होणार आहे.

नांदेड : कोरोना महामारी व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. लॉकडाउनच्या मार्च ते जुलै महिन्यामध्ये जन्म झालेल्या कन्या व याच कालावधीत रक्कम भरू न शकलेल्या पालकांसाठी सवलत मिळणार आहे. विशेष म्हणजे १० ऐवजी आता १८ वर्षापर्यंतच्या मुलींसाठी या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. त्यामुळे लाभार्थी पाल्यांना नव्या नियमांचा लाभ होणार आहे.

कोरोना महामारीने देशात मोठे थैमान घातले आहे. लॉकडाउनमुळे अनेकांच्या हातातील काम गेले आहे. लोकांच्या हातातील रोकड संपत आली आहे. याच दरम्यान सरकारने मुलींना करोडपती बनवणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेत बदल केला आहे. नवीन खाते उघडण्याच्या काही नियमात सुट देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पूर्वी १० वर्षापरंयतच्या कन्येच्या नावेच हे खाते उघडता येत होते. ज्या कन्येचे वय २५ मार्च ते ३० जून २०२० या लॉकडाउनच्या काळात १० वर्षे पूर्ण झाले आहे, त्या कन्यांनाही आता योजनेंतर्गत खाते उघडता येणार आहे.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात वाढली गुन्हेगारी, सोमवारी रात्री पुन्हा एका युवकाचा खून  

कोरोना संकट व लॉकडाउनमुळे अनेक पालकांना इच्छा असतांना देखील या योजनेत सहभागी होता आले नव्हते. त्यांना आता या योजनेत सहभाग घेता येणार आहे. या योजनेंतर्गत नवीन नियमानुसार, १८ वर्षाच्या मुलीही आपले खाते सुरु करू शकतात. या योजनेसाठी यापूर्वी वयाची पात्रता १० वर्षे होती. जेव्हा मुलगी १८ वर्षाची होईल तेव्हा पालकांना मुलीचे कागदपत्र पोस्ट कार्यालयामध्ये जमा करावे लागतील. दोन मुलींपेक्षा जास्त मुलींचे खाते उघडत असताना अधिक कागदपत्रांची गरज असणार आहे.

हे देखील वाचाच - Video : कंत्राटदारांनी नांदेडमध्ये केली शासन निर्णयाची होळी, काय आहे कारण? ते वाचाच

नव्या नियमानुसार दोनपेक्षाअधिक मुलींचे खाते उघडायचे असेल तर जन्म तारखेसह एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. मुलींचे शिक्षण व लग्नासाठी पालकांना गुंतवणूक करता यावी, यासाठी केंद्र सरकारने डाक कार्यालयांतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पालकांना डाक कार्यालयात दरमहा ठराविक रकमेची गुंतवणूक करता येते. सुकन्या समृद्धी योजनेतून सध्या ७.६ टक्के व्याज मिळत आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख तर कमीत कमी २५० रुपये जमा करावे लागतात. खाते सुरु ठेवण्यासाठी कमीत कमी २५० रुपये जमा करता येतात.

येथे क्लिक कराच - ‘या’ गावात भरपूर दूध, पण दुधाचा एकही थेंब विकला जात नाही

आयकरातून मिळते सूट
सुकन्या समृद्धी योजनेतून गुंतवणूक केल्यास संबंधित गुंतवणूकदारास आयकरापासून सुटका मिळते. योजनेत वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी आयकरातून सुट मिळते. योजनेतील व्याज आणि मुदत रक्कम देखील टॅक्स फ्री असते.

हेही वाचलेच पाहिजे - देशभरातील १५ संशोधकांच्या यादीत नांदेडच्या शिवराज नाईकची निवड; या आजारावर केले महत्वपूर्ण संशोधन

चक्रवाढ पद्धतीने मिळते व्याज
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुलींच्या पालकांनी केलेल्या गुंतवणुकीस ७.६ टक्के व्याज मिळते. चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याज आकारणी होत असल्याने मुलींचे शिक्षण व लग्नासाठी ही गुंतवणूक पालकांना उपयुक्त ठरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read What Has Changed In Sukanya Samrudhi Yojana Nanded News