साहित्य संमेलनांची खरी गरज ग्रामीण भागात- डॉ. गोविंद नांदेडे

प्रमोद चौधरी
Monday, 1 February 2021

 
सिंधी (ता.उमरी) येथे रविवारी (ता.३१) झालेल्या पंधराव्या लोकसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

नांदेड ः ‘‘ग्रामीण भागातील मानसिकतेचा बदलण्यासाठी आणि साहित्याची खरी ओळख निर्माण करून देण्यासाठी साहित्य संमेलनांची खरी गरज ग्रामीण भागात आहे. त्यामुळे प्रत्येक खेड्यात साहित्य संमेलने झाली पाहिजेत’’, असे मत माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी केले.

 
सिंधी (ता.उमरी) येथे रविवारी (ता.३१) झालेल्या पंधराव्या लोकसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. भगवान अंजनीकर उपस्थित होते.  ग्रंथदिंडीमध्ये टाळ, मृदंग, लेझिम, गोंधळी आणि जिल्हा परिषद शाळा करकाळा येथील विद्यार्थ्यांनी विविध देखावे सादर केले.

या ग्रंथदिंडीमध्ये संमेलनाचे अध्यक्ष प्रा. भगवान अंजनीकर यांच्यासह मारोतराव कवळे गुरूजी, डॉ. वृषाली किन्हाळकर, देवीदास फुलारी, प्रा. रवींद्र चव्हाण, प्रभाकर कानडखेडकर, पुरूषोत्तम सदाफुले, राजेंद्र वाघ, प्रभाकर साळेगावकर, पांडुरंग देशमुख गोरठेकर, विश्वनाथ बन्नाळीकर, संजय कुलकर्णी, गोविंदराव सिंधीकर, प्रा. नारायण शिंदे, प्रभू पाटील पुयड आदी सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्वागताध्यक्षा संगीता विठ्ठलराव डक आणि संयोजक दिगंबर कदम यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रा. भगवान अंजनीकर म्हणाले, उमरी तालुक्याने मराठी साहित्याला समृद्ध करणारे साहित्यिक दिले आहेत. गोरठ्याचे संत दासगणू महाराज यांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत लोकसंवाद साहित्य संमेलन होणे, ही गौरवाची बाब आहे. साहित्यातून ग्रामीण भागाच्या वास्तवतेचे चित्रण प्रकट झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. याचवेळी संवेदना स्मरणिकेचे प्रकाशन, विरभद्र मिरेवाड यांच्या ‘माती साबूत राहावी म्हणून’ आणि माधव चुकेवाड यांच्या ‘गोडधोड’ या बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या शीतल चांदण्याच्या प्रकाशात पुणे येथील प्रसिद्ध कवी पुरूषोत्तम सदाफुले यांच्या अध्यक्षतेखाली काव्यमैफिल रंगली.

यंदाचे पुरस्कर्ते
लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये यंदा शैक्षणिक, पत्रकारिता, छायाचित्रकारिता, कृषी, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय लोकसंवाद पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्राचार्य डॉ. वसंत बिरादार, ॲड. दिलीप ठाकूर,  संजय येलवाड, सुरेखा कदम, दिवाकर वैद्य, भारत होकर्णे, राम तरटे, शांता उपासे, सूर्यकांत कावळे, बाबाराव विश्वकर्मा, राम गायकवाड आणि दशरथ कांबळे आदींचा समावेश होता.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The real need for literary conventions in rural areas Dr. Govind Nandede nanded news