Nanded : पवित्र पोर्टलची शिक्षक भरती रखडलेलीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

पवित्र पोर्टलची शिक्षक भरती रखडलेलीच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : देशाचे भावी उज्वल नागरिक घडवणाऱ्या शिक्षकांची हजारो पदे शिक्षण विभागात रिक्त आहेत. त्यातच नवीन भरती प्रक्रिया राबविण्याच्या प्रक्रियेतच गोंधळ सुरु असल्याने याचा परिणाम भावी गुरुजींवर होत आहे. केवळ पारदर्शकतेच्या नावाखाली एकाच भरती प्रक्रियेला चार-चार वर्षे लागत असल्याने डीटीएड, बीएड पदवी धारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पवित्र पोर्टलची प्रक्रिया खूपच मंद गतीने सुरु असल्याने गुरुजी होण्याचे अनेकांचे स्वप्न केवळ स्वप्नच राहणार असल्याची भावना देखील अनेक भावी शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

राज्यभरात शिक्षक भरती करण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्ये परीक्षा घेण्यात आली. चार वर्ष झाली तरी, पवित्र पोर्टलची प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही. तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यापासून सुरु झालेली ही प्रक्रिया माजी मंत्री आशिष शेलार आणि आता विद्यमान शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचली आहे. राज्यात सेना-भाजपचे सरकार बदलून महाविकास आघाडीचे सरकार आले तरी, शिक्षक भरतीचा पवित्र खेळ सुरुच आहे.

या ना त्या कारणाने भरती पुढे ढकलली गेली, तत्कालीन युती सरकारने पारदर्शकपणे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले. शिक्षक भरतीत भ्रष्टाचार होऊ नये, गुणवत्तापूर्वक शिक्षक शाळांना मिळावेत, यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय २०१७ मध्ये विनोद तावडे यांनी घेतला. आतापर्यंत या पोर्टलवर एक लाख २३ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, माध्यमिक व प्राथमिक शाळांनी पोर्टलवर जाहिरातीही प्रसिद्ध केलेल्या आहेत. पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांनी शिक्षकांची मुलाखतशिवाय गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी होकार दर्शविला. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळासाठी मेरीटनुसार नियुक्त्या करण्यात आल्या. पण खासगी संस्थांनी मुलाखती घेऊन शिक्षकांच्या निवडी करण्याचा अधिकार देण्याचा हट्ट धरला होता.

निमित्त कोरोनाचे

भावी गुरुजींच्या आयुष्यातील चार वर्ष नोकरीची वाट पाहण्यात गेली. नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाच्या तोंडावर भरतीची प्रक्रिया सुरु करण्याची आल्याची घोषणा केली. मात्र, अद्याप ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. ही भरती कोरोनाच्या विळख्यात अडकली. कोरोनामुळे आर्थिक उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने चार मे २०२० रोजी वित्त विभागाच्या एका पत्रकाद्वारे नोकर भरतीवर स्थगिती आणली. यामुळे लाखो डीटीएड, बीएड धारकांना वाटच पाहावी लागत आहे. मंद गतीने सुरु असलेल्या या भरतीमुळे अनेक तरुणांचे वय निघून जात आहे. त्यामुळे अनेक अभियोग्यता धारकांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे, हे निश्चित.

चार वर्षापासून मी भरतीची प्रतीक्षा करत आहे. उच्च शिक्षण घेऊनही शेतामध्ये मजुरीची कामे करून उदरनिर्वाह करावा लागत आहे. शासनाने आता अंत न बघता भरती करावी.

- श्यामराव सोनवणे (भरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवार)

loading image
go to top