
नांदेड - कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात लग्न तसेच इतर सण, धार्मिक सोहळे आदींवर गर्दी होत असल्यामुळे बंधने घालून बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अनेकांना त्या काळात तारखा बदलून घ्याव्या लागल्या तर काहींनी शासनाच्या नियमांचे पालन करत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सोहळे आटोपले. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता या काळामध्ये रजिस्टर मॅरेज उत्तम पर्याय ठरला आहे.
जगभरातील अनेक देशात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी लॉकडाउन करण्यात आले होते. लग्न तसेच इतर सण, धार्मिक सोहळे आदींवर गर्दी होत असल्यामुळे बंधने घालून बंद ठेवण्यात आले होते. तब्बल दोन महिन्यानंतर आता हळूहळू लॉकडाउन शिथिल करण्यात येत आहे. त्यानुसार आता मंगल कार्यालयांसह इतर ठिकाणी लग्न सोहळ्यास नियम व अटींच्या शर्थी घालून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लग्न सोहळ्यासाठी फक्त ५० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नियमानुसार लग्नसोहळे पार पडत असले तरी अनेकांनी रजिस्टर्ड मॅरेजचा पर्याय निवडल्याचेही चित्र आहे.
विवाह नोंदणी कार्यालय सुरु
कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात अनेकांचे नुकसान झाले तसे नोंदणी पद्धतीने विवाह (रजिस्टर मॅरेज) करणाऱ्यांचे देखील झाले. नांदेडचे विवाह नोंदणी कार्यालय कोरोना आणि लॉकडाउनमुळे ता. २० मार्च ते ता. १८ मे पर्यंत बंदच होते. त्यानंतर मात्र, कार्यालय सुरु झाले असून आता रजिस्टर मॅरेज करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. सध्या कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने लग्न सोहळ्यांसह इतर धार्मिक कार्यावर बंधने टाकली आहेत. त्यामुळे अशा काळात रजिस्टर मॅरेजचे महत्व वाढले असून असे लग्न करणाऱ्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे.
लग्नाची अशी आहे पद्धत
नांदेडला व्हीआयपी रस्त्यावर सह दुय्यम निबंधक तथा विवाह अधिकारी कार्यालय आहे. या ठिकाणी विवाह नोंदणी (रजिस्टर्ड मॅरेज) करता येते. त्यासाठी आॅनलाईन अर्ज भरावा लागतो. एक महिना आधी नोटीस दिल्यानंतर ३० दिवसानंतर कोणाचा आक्षेप आला नाही तर विवाहाची नोंद करण्यात येत असल्याची माहिती सह दुय्यम निबंधक तथा विवाह अधिकारी नागोराव पतलेवाड यांनी दिली. त्यासाठी काही नियम असून त्यामध्ये वर किंवा वधूपैकी एकजण या जिल्ह्यातील रहिवासी असावा. वराचे वय २१ आणि वधूचे वय १८ वर्षे असावे. निषध्द रक्तनातेसंबंधी नसावा. रेशनकार्ड, आधारकार्ड तसेच वयाचा पुरावा देण्यासाठी टीसी, सनद असावी. या व इतर बाबींची पूर्तता आॅनलाईन केल्यानंतर विवाहाचा दाखला विशेष विवाह अधिनियम १९५४ (कलम १३) नुसार विवाह नोंदणी करण्यात येते.
हेही वाचलेच पाहिजे - नांदेडात आजही कोरोनाने घेतला दोघांचा बळी, एक पॉझिटिव्ह
जानेवारीपासूनच्या झालेल्या नोंदी
नोंदणी विवाह कार्यालयात जानेवारी महिन्यात २५, फेब्रुवारीत २० नोंदणी विवाह झाले. मार्च महिन्यामध्ये ता. २० मार्चपर्यंत १९ नोंदणी विवाह झाले. त्यानंतर कोरोना आणि लॉकडाउनमुळे ता. १९ मे पर्यंत कार्यालय बंद होते. त्यानंतर मे महिन्यात १४ तर जून महिन्यात ता. १० जूनपर्यंत १२ नोंदणी विवाह झाले. लॉकडाउनच्या आधी अडीच महिन्यात ६४ नोंदणी विवाह झाले आणि लॉकडाउननंतर वीस दिवसात २६ नोंदणी विवाह झाले आहेत.
सध्याच्या परिस्थितीत उत्तम पर्याय
कोरोना आणि लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये सर्व नियमांचे पालन करण्यासाठी नोंदणी विवाह (रजिस्टर्ड मॅरेज) ही एक चांगली पद्धत आहे. यामुळे लग्नातील खर्च टाळला जातो तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालनही होते.
- नागोराव पतलेवाड, सह दुय्यम निबंधक तथा विवाह अधिकारी, नांदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.