‘तो’ तांदूळ सरकारी वितरणाचाच- गुन्हा दाखल

फोटो
फोटो

नांदेड : जिल्ह्यातील गोरगरीबांच्या तोंडचे अन्न पळवून (स्वस्त धान्य) ते अन्न काळ्या बाजारात जाण्याच्या घटना नेहमी उघडकीस येतात. नुकतेच एका धान्य घोटाळ्यातून सर्व आरोपींचा जामिन मिळाला आहे. हे प्रकरण ताजे असतांनाच पुन्हा इतावारा पोलिसांनी जवळपास साडेसात लाखाचा शासकिय वितरणाचा तांदूळ काळ्या बाजारात जात असतांना जप्त केला. या प्रकरणी तब्बल तिन दिवसांनी चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रेशनचा तांदूळ बेकायदेशीररित्या काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असताना इतवारा पोलिसांनी त्यांच्या हद्दीत आलेल्या शासकीय वितरणाच्या तांदळाचा ट्रक जप्त करून संबंधितांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

गस्तदरम्यान झाली कारवाई

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतवारा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळू गीते हे आपल्या पथकासह आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. ता. १४ जूनच्या सायंकाळी ते बाफना टी पॉइंटजवळ आले असता त्यांना एक ट्रक (एसएच२६- २५८९) संशयीतरित्या उभा असलेला दिसला. त्यांनी ट्रकमधील मालासंबंधी चालकास माहिती विचारली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. धान्य व ट्रक पोलीसांनी जप्त करून इतवारा पोलिस ठाण्यात आणला.

तांदळासह १९ लाख ५० हजाराचा ऐवज 

या संदर्भाने नायब तहसीलदार सारंग चव्हाण यांनी तपासणी केली असता तर ट्रकमधील तांदूळ स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे समोर आले. याबाबत चालक शिवाजी घोगरे यांना पोलिसांनी विचारणा केली असता तांदळाचे पोते हे संजय महादेवआप्पा नीला उर्फ पाठक यांचे असून ते निलंगा येथे राहतात. ट्रकमध्ये तांदळाचे ५०० पोते आढळून आले असून त्याची किंमत सुमारे साडेसात लाख रुपये एवढी आहे. बारा लाख रुपयाचा ट्रक आणि साडेसात लाख रुपये तांदूळ असा एकूण १९ लाख ५० हजाराचा ऐवज इतवारा पोलिसांनी जप्त केला आहे.

इतवारा पोलिसांचे एक पथक निलंग्याला जाणार

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बाळू गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय महादेवआप्पा नीला याच्यासह अन्य एकाविरूद्ध जीवनावश्‍यक वस्तू कायद्यान्वये इतवारा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे हे करत आहेत. सदर रेशनचा तांदूळ निलंगा येथून जाऊन गोंदियाकडे जात असल्याचे सांगण्यात आले. मुख्य आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसली तरी पोलिसांचे एक पथक निलंग्याला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com